पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेल्याच असत्या. तिथे रक्षणार्थ १५-२० तरुण सज्ज होते. पण बंदुकांचे आवाज ऐकताच एकदम कळप उधळावा तसे रझाकार उधळले आणि जीव मुठीत धरून पळत सुटले व मुख्य मिरवणुकीत दाखल झाले. आता सर्वांनाच सत्य साक्षात प्रत्ययाला आले होते. आता लढण्याची कुणाची इच्छा नव्हती. आमचे नेते नजीरअली व अखलाक हुसेन सांगतील तसे वागणे आमचे कसे कर्तव्य आहे, हे गर्दीत अनेक जण समजावून सांगू लागले. तोच शहानवाझखान अखलाक हुसेनची चिठ्ठी घेऊन आला.

 ह्यानंतर शांतपणे सारा जुलूस झेंड्याखालून घोषणा देत गेला. प्रथमच रझाकारांना हिंदूंच्या सामर्थ्यापुढे निमूटपणे झुकावे लागत होते. पण ह्यामुळे भीषण रक्तपात मात्र टळला. अशक्यतेची जाण आली, की रझाकार व त्यांचे नेते एकदम सुजाण झाले. मुख्य नाटक संपले होते. पण अजून समारोप व्हावयाचा होता. राष्ट्रध्वजावर अखलाक हुसेनची शेरवानी होती. ती काढताना ध्वज खाली आला. आता काय करावे? गांजव्यांनी किरकोळ गोष्ट सांगितल्याप्रमाणे सांगितले. तुम्ही तुमच्या हाताने ध्वज पुन्हा लावा व आपण दोघे मिळून ध्वजाला अभिवादन करू. शेजारी वीस पिस्तुले अजून होती. तेव्हा अखलाक हुसेन म्हणाले, हा तर फारच योग्य उपाय आहे. त्यांनी ध्वज उभारला. गांजवे व अखलाक हुसेन ह्यांनी ध्वजाला वंदन केले. शेजारच्या गच्चीवरून कलेक्टरांनी ह्या घटनेचा फोटो घेतला. पोलिस अॅक्शनपूर्वी इत्तेहादुल मुसलमीनच्या अध्यक्षांनी उभा करून वंदिलेला हा पहिला राष्ट्रध्वज !

 ह्यानंतर गांजवे यांनी सुरक्षितपणे अखलाक हुसेनला खालच्या सडकेवर आणले. जिवंतपणे आपण सडकेवर पोचलो, आता भीती नाही याची खात्री पटताच रझाकार नेत्याचे धैर्याचे उसने अवसान गळून पडले. त्याने गांजवे यांना मिठी मारली व त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचे रडे थांबावयास दोन-तीन मिनिटे लागली. अशा प्रकारे बलिदानाची जिद्द विजयी झाली. ह्यानंतर दोन-चार दिवसांत कार्यकर्ते भूमिगत झाले.

***

(प्रकाशन : दैनिक 'मराठवाडा' १५-८-१९७२)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८९