पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






४.
कै. स्वामी रामानंद तीर्थ : एक पत्र व चर्चा

पू. स्वामीजींच्या चरणी शि. सा. न.

 आपले आत्मवृत्त वाचले. आपण ह्या हैदराबाद संस्थानातील जनतेचे मुक्तिदाते म्हणून आम्हाला चिरवंदनीय आणि प्रातःस्मरणीय आहात ह्यात शंकाच नाही. त्याबरोबरच आपण स्वार्थरहित आणि अहंकाररहित संन्यासीही आहात. जीवनाचे काही दिवस आपल्या नेतृत्वाखाली एका भव्य लढ्यात अतिशय धुंदीत मी काढू शकलो, ह्याबद्दल मला नेहमीच धन्यता वाटली. ज्यांच्या पायावर डोके ठेवताना मला तृप्ती लाभली, त्यांपैकी आपण एक आहात.

 हे आणि यासारखे मी पुष्कळच लिहू शकेन. एक तर अशा प्रकारच्या स्तुतिस्तोत्रांची तुम्हाला सवय नाही व तुम्हाला ‘एम्ब्रेस' करण्याची माझी इच्छा नाही. आणि दुसरे जिथे सध्या पोटपाणी सुरक्षितपणे चालू आहे, त्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे मला तुमची स्तुती जपून करण्याची इच्छा आहे. आपण नोकरीमुळे भाटगिरी करतो आहो, असे मला वाटायला नको आणि तुम्हालाही वाटायला नको. आदर हा मौनात असावा. श्रद्धा ही कृतीतून दिसावी हे बरे.

 आत्मवृत्त लिहिण्यापूर्वी तुमचे-माझे दीर्घ बोलणे झाले होते. ह्या बोलण्यात आत्मवृत्तकाराकडून दुहेरी अपेक्षा कोणत्या असतात याची आपणास कल्पना दिली होती. एक तर व्यक्तिजीवनाचे चित्र त्यात तपशिलाने असावे आणि दुसरे म्हणजे ज्या सामाजिक परिवर्तनाचे आपण कर्णधार होतो, त्याचे महत्त्वपूर्ण तपशील आपण मोकळेपणाने सांगावे, अशी माझी आग्रहपूर्वक प्रार्थना होती.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५३