पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवणाऱ्या नेतृत्वाला हा लढा सातत्याने व नेटाने चालवता आला नाही ही गोष्ट उघड होते. १९३८ हा हैदराबादच्या राजकारणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. राजकीय संघटनांची निर्मिती, राजकीय कार्यकर्त्यांच्या पहिल्या फळीचा उदय व हिंदूंच्या प्रतिकाराचा आरंभ या सर्व बाबी १९३८ पासून सुरू होतात. इतिहासाच्या क्रमात पाहायचे तर हैदराबादचे आंदोलन धार्मिक प्रश्नावरून सुरू होते व राजकीय प्रश्नांच्या दिशेने विकसित होते. हैदराबादेतही समोर रझाकार लढत असताना आणि मुसलमानी अत्याचार डोळ्यांसमोर दिसत असताना धार्मिक राजकारण प्रभावी होत नाही याचा हिंदुत्ववादी मंडळींनी गंभीरपणे विचार केला पाहिजे, असे मला वाटते.
 धार्मिक राजकारण सर्व आर्थिक, राजकीय प्रश्न आपल्या पोटात सामावून घेण्याइतके व्यापक झाले नाही तर ते प्रभावी होत नाही. हा जसा अडतीस सालचा एक बोध आहे त्याप्रमाणे धार्मिक प्रश्नांचाही शेवट आर्थिक व राजकीय प्रश्नातच होतो, धार्मिक प्रश्न हे मूलतः आर्थिक व राजकीय असतात असाही या घटनेचा बोध आहे. तुम्ही स्पष्टीकरण कसेही करा हैदराबादचा राजकारणाचा आरंभ १९३८ पासून होतो ही घटना मात्र निर्विवादपणे सर्वांनी मान्य केलेली आहे.

***

(प्रकाशन : धर्मभास्कर १९७८)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन/ ५२