पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी शून्य झालो. जिथे मीच शून्य झालो तिथे इतरांच्याविषयी ओलावा आणू कुठून? तुमची सारवासारव आहे. तुम्हाला कुणाविषयी वाईट लिहावयाचे नव्हते, त्याशिवाय सहकाऱ्यांविषयी जिव्हाळ्याने लिहिणे शक्य नव्हते, हे सत्य एकदा तरी कबूल करा... (नो कॉमेंट)

 आपण संन्यासी आहात पण धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणा आपल्या . जीवनात कधीच प्रबल दिसत नाहीत. स्वार्थरहित समाजसेवेचा मार्ग म्हणूनच आपण संन्यास स्वीकारलेला दिसतो. प्राचीन भारताविषयी फारशी गौरवबुद्धी आपल्या मनात नाही. स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ ह्यांच्या मनातं प्राचीन भारताविषयी महान गौरव होता. आपल्या मनाचे हे परिवर्तन मूळचेच की उत्तरकालीन अभ्यासाचा परिणाम हे आपण आत्मवृत्तात सांगितलेले नाही. खरे म्हणजे स्वतःच्या वैचारिक, विकासाचाच त्यात आढावा घेतलेला नाही. ही एक उणीव म्हटली पाहिजे.

 (स्वार्थरहित समाजसेवा आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा वाटत नाही, ही विचारांची अपक्वता आहे.)

  आपणाकडून अनेक बाबींच्यावर प्रकाश पडणे अपेक्षित होते. संस्थानविषयक प्रश्नांच्याकडे काँग्रेस १९२७ नंतर अधिक लक्ष देऊ लागली. संस्थानांच्यासाठी एक अखिल भारतीय संघटना जन्माला घालण्याचा अतोनात प्रयत्न काँग्रेसने केला. ह्यामागची भूमिका नेमकी कोणती होती? 'डोमिनियन स्टेट्स' हे जोपर्यंत ध्येय होते, तोपर्यंत संस्थानांचा विचार फार गंभीरपणे करण्याची गरज नव्हती. पण संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठरले की संस्थानांचा विचार करणे भाग पडले हे खरे आहे का? की....

 संस्थाने हा गमावलेल्या स्वातंत्र्याचा अवशेष आहे, ही भूमिका अनुभवांनी बदलली व संस्थाने हा गुलामगिरीचा संरक्षक किल्ला आहे, ही नवी भूमिका स्वीकारावी लागली म्हणून स्टेट्स पीपल्स कॉन्फरन्सचा उदय झाला? संस्थाने संपली पाहिजेत ह्या निर्णयावर गांधीजी व सरदार केव्हा आणि का आले?

 (शिपायाकडून इतिहासकाराची अपेक्षा नसावी.)

 हैदराबाद स्टेट्स् काँग्रेसच्या स्थापनेला एकोणीसशे अडतीसपर्यंत गांधीजींनी आशीर्वाद दिलेला नव्हता. त्यांनी १९३८ साली आशीर्वाद का दिला? १९३५ च्या कायद्यात चेंबर ऑफ प्रिन्सेसची स्वतंत्र सोय होती. फेडरेशनमध्ये येण्यासाठी संस्थानिकांना स्वतःच्या अटी घालण्याचे स्वातंत्र्य होते. ही घटना भारताच्या अखंडत्वाला धोक्याची

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५५