पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले. याला अपवाद नव्हते असं नाही. काही माणसे खरोखर उदात्तच होती. उरलेली माणसे सर्वांच्या सारखी. स्वप्नात आम्ही होतो. माणसे माणसासारखी वागत होती हा दोष त्यांचा नव्हताच, आमचा होता.

 काही मतदार संघात राजकीय पक्ष अतिशय बेजबाबदारपणे वागे. एका मतदार संघात आमच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. मी त्याला विचारले, “या मतदार संघात आपल्या पक्षाचे सभासद किती?" तो म्हणाला, “माझ्या गावात शंभर आहेत उरलेल्या मतदार संघात सभासद नोंदणी नाही". मी विचारले, “ज्या मतदार संघात आपले कार्य नाही, कार्यकर्ते नाहीत तिथे निवडणूक लढवायची कशाला? ही हमखास पडणारी जागा नाही काय?" आमचा विधानसभेचा उमेदवार म्हणाला, “लोकांना लाज असेल तर ते मला मते देतील. शेवटी बहुसंख्यांक मतदार गरीब असतात. ते माझ्याशिवाय इतर कुणाला मत देणार?" अजून एका मतदारसंघात आमच्या पक्षाच्या वतीने जुना रझाकार नेताच उभा होता. मी ज्येष्ठ मंडळींना विचारले, “याला तुम्ही तिकीट कसे दिले?" ज्येष्ठांचे म्हणणे असे पडले की, “निवडणुका जिंकण्यासाठी असे डावपेच आवश्यकच असतात. मी उदाहरणं समाजवाद्यांचीच देतो आहे कारण तो मी माझा पक्ष मानतो. इतर पक्षांच्या वतीने सर्रास गणंग, गुंड आणि भ्रष्ट लोक उभे राहिलेले दिसत होते. पण त्याचे फारसे वाईट वाटत नव्हते कारण ते पक्षच भ्रष्ट मंडळींचे आहेत, असे आम्ही समजत होतो. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालांचे चित्र आम्हाला अगदी अनपेक्षित होते.

 मराठवाड्यातून हैदराबाद मुक्ती आंदोलनातील सर्व तरुण तडफदार आणि जिद्दीचे कार्यकर्ते व यशस्वी क्रांतिवीर ज्या जनता आघाडीच्या वतीने उभे होते तिची सर्व माणसे पडली. गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली असणारे २७ जण गोविंदभाईसह पडले. यांतील निम्म्याहून अधिक मंडळींची अनामत रक्कम जप्त झाली. समाजवादी पक्ष सर्व देशभर मोठ्या प्रमाणात पडला. त्यांचे लोकसभेत २५ खासदारसुद्धा निवडून आले नाहीत. वर हैदराबादेतील ज्या तरुण नेत्यांचा उल्लेख आलेला आहे, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. हैदराबाद संस्थानात समाजवाद्यांचे कसेबसे दहा लोक निवडून आले. यात सर्व मोठे नेते पडले.

 इ.स. १९५२ सालच्या मार्चमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळी मला हे प्रथम लक्षात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३२