आले की काँग्रेस प्रचंड प्रमाणात निवडून आली आहे. ती पाच वर्षे काँग्रेसचे राज्य राहणारच. पण पाच वर्षानंतरसुद्धा काँग्रेसचा पाडाव करणे कठीण आहे. समाजवादी पक्षाचा सर्व देशभर नुसता पाडाव झालेला नाही; त्यांची मानसिक शक्तीच इतकी खच्ची झालेली आहे की यापुढे नजिकच्या भविष्यकाळात काँग्रेसला प्रतिस्पर्धी संघटना म्हणून पक्ष उभा राहण्याची शक्यता नाही. लोकशाही मार्गाने आपल्या देशात समाजवादाचा विजय हाईल हे तर फार दूर आहे. पण सशस्त्र क्रांतीचा उठाव करण्याची शक्तीसुद्धा कुठे शिल्लक नाही. गोरगरीब जनता प्रतिष्ठित आणि श्रीमंत यांच्याविरुद्ध गरिबांच्या पक्षाला मतदान करीत नसते. धर्म, जाती, अंधश्रद्धा, पैसा यांचा वापर करून , समाजातील प्रस्थापितांचे वर्ग जितक्या सहजतेने निवडणुका जिंकतात तितके समाजवाद्यांना निवडणुकीत विजयी होणे सोपे नसते. भारताच्या ग्रामीण भागात जमीनदार आणि संस्थाने पुरेशी प्रभावी आहेत हे तर खरेच आहे. पण प्रमुख शहरांतही कामगारांच्या पक्षांना निवडणुका जिंकणे फारसे जमलेले नाही.
क्रांती लोकशाही मार्गाने की हुकूमशाही मार्गाने हा प्रश्नच गौण आहे. कोणत्याच मार्गाने क्रांती होण्यासाठी अजून पूर्वतयारीच झालेली नाही. हे मला जाणवू लागले, तिथून क्रमाने माझा स्वप्नाळूपणा संपत आला व राजकारणाच्या डोळस, वास्तववादी अभ्यासाला आरंभ झाला. एकाएकी मला जाणवले की शिक्षणाची गाडी पूर्णपणे हुकलेली आहे. अनेकदा नापास झालेला, पास होण्याची शक्यता नसलेला बेकार तरुण आपण. पदवी नाही, ती मिळवण्याची शक्यता नाही. नोकरीही नाही. राजकारणात तर आपण पराभूत आहोतच. पण व्यक्तिगत जीवनातसुद्धा आपण पराभूत. एखाद्या मुलीच्या आयुष्याचा नाश करण्याचा आपल्याला हक्क नाही. खरे म्हणजे कुणावर प्रेम करण्याच्या लायकीचेच नाही. आपले सगळेच आयुष्य वाया गेले. प्रचंड निराशा, वैफल्य आणि व्यर्थपणा याची उत्कट जाणीव यावेळी मला सर्वप्रथम झाली. ५२ सालचे सगळे वर्ष असे निराशेने, काळोखाने व्यापलेले गेले.
यानंतरच्या काळात मी निराशेतून बाहेरही पडलो. पदवीही मिळवली. उशिरा का होईना प्राध्यापक झालो. हे सगळे खरे असले तरी ५२ साली मी जे नैराश्य भोगले ते त्यामुळे खोटे ठरत नाही. या नंतरच्या काळात फारसे खोटे भ्रम माझ्या मनात कधीच निर्माण झाले नाहीत. आज बावन्न सालची निराशा मला पुन्हा पुन्हा एक आठवण म्हणून जाणवते आहे. ज्या पद्धतीने जनता पक्षाचा विजय झाला, आणि ज्या