ज्येष्ठ नेते मला बोलताना म्हणाले, ४२ पैकी आम्ही फक्त २७ जागांच्यापैकी क्वचितच एखादी जागा पडेल. पण निवडणूक म्हणजे जुगार. त्यामुळे आमची किमान वीस माणसे निवडून येतील असे आम्ही मानतो. हे जे २७ जण उभे होते त्यांच्याविषयी तर माझ्या मनात इतके गाढ प्रेम होते की ती सगळीच माणसे निवडून यावीत असे मला वाटत असे. सर्व भारतभर समाजवादी पक्ष निवडून यावा. हैदराबादेत मात्र स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते - मग ते कोणत्याही पक्षातील असोत, निवडून यावेत हे वाटणे मुळातच चुकीचे आहे. हे काही त्यावेळेला मला जाणवले नाही.
हैदराबाद संस्थानात ही पहिली निवडणूक म्हणजे एक चमत्कारिकच बाब होती. पुष्कळ वेळेला निवडणुकीला उभे राहिलेल्या प्रतिस्पर्धी उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी विरोधी पक्षातील आपला लाडका नेता येतो आहे. म्हणून एक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराची सभा सुद्धा जातीने हजर राहून निर्विघ्नपणे पार पडावी याची काळजी घेत असे. गोविंदभाई श्रॉफांच्याबाबत तर हे नेहमीच घडे. ते काँग्रेसविरोधी प्रचार करण्याच्या दौऱ्यावर असत आणि पुष्कळदा काँग्रेसचाच उमेदवार त्यांचे जेवणखाण आपल्या घरी आग्रहाने करी, त्यांच्या सभेची व्यवस्था करी. काही लोकप्रिय इतर उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा असा प्रकार घडलेला मधून मधून दिसत असे. मी स्वतः अशा सभा पाहिलेल्या आहेत की, जिथे एकाच सभेत विधानसभेचे दोन परस्परविरोधी उमेदवार येऊन बोलले. ही निवडणूक जसजशी रंगात आली तसतसा माझा भ्रमनिरास होऊ लागला.
पहिली गोष्ट म्हणजे दोन आदरणीय नेते जाहीर सभेत परस्परांच्या उखाळ्या पाखाळ्या काढताना आणि खाजगी बैठकीत एकमेकांच्या विषयी अत्यंत तुच्छतेने बोलताना मी प्रथमच पाहात होतो. ही नेते मंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत हे पाहिले म्हणजे प्रचंड दुःख वाटत असे. जाहीर सभेत बोलल्या जाणाऱ्या अनेक बाबी आणि खाजगी बैठकीत होणाऱ्या चर्चा यांचा परस्परांशी काही ताळमेळच नसे. एकाच पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा एकमेकांशी ज्या दुष्टाव्याने वागत ती बाब पाहताना अतिशय वेदना होत असत. लढ्यांच्या काळात सर्व उदात्तपणा उसळून वर आलेला मी पाहिलेला आहे. ती भव्यता, दिव्यता हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे मी उगीचच गृहीत धरून चाललो. भव्य, दिव्य घटना घडत असतात. ज्या व्यक्ती सर्वार्थाने उजळलेल्या दिसल्या त्या