पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या कार्यकर्त्याने आधीच जाहीर केलेले असल्यामुळे त्या मतदारसंघात उभे राहण्यास काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तयारच नाही असे आमच्या गोटात सार्वत्रिक मत. या कार्यकर्त्याला मी जाऊन भेटलो आणि हैदराबाद संस्थानमधील निवडणुकांची मी त्यांच्याशी चर्चा केली. आमचे नेते अतिशयोक्ती न करता अतिशय मोजके अनुमान करण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांनी मला सांगितले लोकसभेत या निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता अजिबात नाही. कमीत कमी दीडशे आणि जास्तीत जास्त पावणेदोनशे जागा मिळतील. केंद्रीय शासन निवडणुकीच्या मार्गाने जर आपल्या हाती यायचे असेल तर ५-१० वर्षे वाट पाहणे आवश्यक आहे. काँग्रेसने इंग्रज राजवटीच्या विरूद्ध वर्षानुवर्षे वाट पाहिली. आपण स्वतंत्रपणे पक्ष म्हणून अस्तित्वात येऊन अजून पाच वर्षे झालेली नाहीत. तेव्हा आपण वाट पाहणे शिकले पाहिजे. अशोक मेहता जेव्हा दोन पक्षांपैकी आपला पक्ष एक राहील म्हणतात त्यावेळी आपण क्रमांक दोनचा पक्ष राहू असा त्याचा अर्थ असतो. या नेत्यांनी मला सांगितले हैदराबाद संस्थानात आपला पक्ष फार दुर्बळ आहे. तेव्हा ४० पेक्षा जास्त जागा या प्रांतात आपल्याला मिळणार नाहीत. भारताच्या तीन प्रांतात आपली सरकारे येतील. तीन प्रांतांत फार थोड्या फरकाने आपले बहुमत जाईल. उरलेल्या प्रांतात आपण प्रमुख विरोधी पक्ष असू.

 ही सगळी मीमांसा आमच्या समोर असणाऱ्या अत्यंत मान्यवर तरुण नेत्यांची. कधीकाळी समाजवादी सरकार अस्तित्वात आले तर हा आमचा तरुण नेता त्या सरकारात अर्थ आणि नियोजन ही दोन्ही खाती सांभाळणारा मंत्री असणार. यावावत आम्हा पोरासोरांना खात्री होती. आज हे लक्षात येते की ज्यांना मी जेष्ठ नेते समजत होतो तेही अधांतरी हवेतच तरंगत होते. पण त्यावेळी मात्र असे वाटे की हा आमचा नेता अतिशय अचूक भविष्यवेध घेणारा, अतिशय मार्मिक विवेचन करणारा आहे.

 ५२ सालच्या निवडणुकीत माझे मन चमत्कारिकपणे द्विधा झालेले होते. सर्व भारतभर समाजवादी पक्ष निवडून यावा असे मला जरूर वाटत होते. पण हैदराबाद संस्थानात मात्र हैदराबाद मुक्ती आंदोलनातील काही ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे होते. या ज्येष्ठ नेत्यांच्याविषयी मला प्रेम आणि आदर असे. ते पडावेत असे मला वाटत नव्हते. आमच्या मुक्ती आंदोलनातील आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मुख्य संच 'जनता लोकशाही आघाडी' या नावाने मराठवाड्यात निवडणुका लढवीत होता. त्याचे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३०