सरदारांच्या शोकसभेत मी काय बोललो याची आजही मला स्वच्छपणे आठवण आहे. हैदराबाद संस्थानातील रहिवासी असल्यामुळे सरदारांच्याविषयी माझ्या मनात कृतज्ञता आणि आदरभावना होतीच. सरदार पटेल यांच्याविषयी समाजवाद्यांच्या मनात फारसा राग कधीच नव्हता. सरदार समाजवादी नाहीत. आपण समाजवादी असल्याचा त्यांचा दावा नाही. शिवाय ते जनतेचे लोकप्रिय पुढारी नाहीत. सत्तरी ओलांडलेला हा आजारी वृद्ध कणखर व दृढनिश्चयी आहे. पण तो फार काळ जगणारा नाही. सरदार हे समाजवादाचे खरे शत्रूच नव्हते. पाच-चार वर्षांत ते मरूनही जातील. . समाजवादाला खरा विरोध नेहरूंचा आहे असे आमची मंडळी खाजगीत बोलत.. विशिष्ट दिवशी सरदारांचा मृत्यू होईल असे आम्हालाही माहीत नव्हते. पण ते फार दिवसांचे सोबती नाहीत याची सर्वांनाच जाणीव होती. सरदारांच्या शोकसभेत मी त्यांचे गुणगान केले, आणि समारोप करताना असे मी भाकित वर्तविले की, काँग्रेस संघटना सांभाळणारा आता कुणी जेष्ठ नेता उरलेला नाही. या अप्रिय होत जाणाऱ्या आणि ढासळत जाणाऱ्या संघटनेला फारसे भविष्य नाही. काँग्रेस या देशात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही, जनतेचे दारिद्र्यही दूर करू शकणार नाही. गोरगरीब जनता आपले दारिद्र्य सहन करून काँग्रेसला मते देईल याची शक्यता फार कमी आहे. म्हणून भारतात लोकशाही टिकली तर काँग्रेसला भविष्य नाही.
खाजगीत आम्ही त्या काळी नेहरूंचा चेंग कै शेक होणार याबाबत निःशंक होतो. खाजगी बैठकीत आम्ही असे म्हणतच असू की ध्येयवादाच्या प्रेमापोटी जर नेहरूंनी लोकशाही टिकविण्याचा अट्टाहास धरला तर लोकच काँग्रेसचा पराभव करतील. आणि सत्तेत टिकून राहण्यासाठी जर नेहरूंनी लोकशाही गुंडाळली तर मग आम्ही सशस्त्र क्रांतीला मोकळे आहोत. त्यानंतर नेहरूचे भवितव्य चेंंग कै शेकपेशा निराळे असणार नाही. आम्हाला कोणत्याच बाबतीत वास्तववादाचे भान कसे नव्हते हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी ही माहिती पुरेशी ठरते. १९५१ साल मध्यावर आले आणि निवडणुकीचे नगारे वाजू लागले. त्यावेळी आम्ही अजून भ्रमातच होतो.
५२ सालच्या निवडणुकीत भारतात दोन प्रमुख पक्ष निवडून येतील. या दोन प्रमुख पक्षांपैकी एक समाजवादी पक्ष असेल असे अशोक मेहतांनी जाहीर रीतीने सांगितलेले होते. त्यावेळी मी हैदराबाद शहरातील सर्वात बुद्धिमान मानल्या गेले तरुण समाजवादी कार्यकर्त्याला मुद्दाम भेटण्यास गेलो. आपण कुठून उभे राहणार