पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तुच्छ प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटत नव्हते. येऊन जाऊन एक प्रश्न समोर होता, तो म्हणजे राजकीय क्रांती झाली पण अजून समाजवाद आलेला नाही तेव्हा आपल्या प्रेयसीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' हे समाजवादी क्रांती होण्याच्या आधी सांगणे योग्य ठरेल की ती क्रांती होईपावेतो वाट पाहणे योग्य ठरेल!

 व्यक्तिगत जीवनात माझे मन एका अल्लड मुलीला देऊन मी बसलो होतो. ती अजून वयात आलेली नव्हती, अजून लुगडे नेसत नव्हती, शाळेत जाताना परकर आणि घरी तर चक्क भावाचे कुडतेच घालून वावरत असे. (याच मुलीने पुढे सर्व सुखदुःखात अपार कष्ट उचलून अत्यंत खंबीरपणे माझा संसार सांभाळला.) या मुलीला आपण काय जिंकले आहे याचा पत्ता असण्याचे कारण नव्हते आणि सार्वजनिक जीवनात माझे मन समाजवाद या कल्पनेला वाहिलेले होते. समाजवादी क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, चार-दोन वर्षांत तीही होऊन जाईल याची पुरेपूर खात्री मला पटलेली होती. व्यवहाराचा कोणताच पोच नसलेल्या स्वप्नात आम्ही वावरत होतो. त्या स्वप्नातून बावन्न साली बाहेर पडणे हा योग आमच्या वाट्याला येणे अपरिहार्य होते.

 इ.स. १९५२ सालाची निवडणूक ही प्रौढ मतदानावर आधारलेली स्वतंत्र भारतातील पहिलीच निगडणूक. आमच्यासारख्या तरुण मुलांना निवडणूक हे काय प्रकरण असते हे फारसे कळतच नसे. आम्ही ज्यांना आमचे ज्येष्ठ नेते मानत होतो त्यांना तरी निवडणूक म्हणजे काय हे किती प्रमाणात समजत होते याविषयी मला शंकाच आहे. काँग्रेसची लोकप्रियता झपाट्याने घसरत जात आहे आणि आता काँग्रेसपक्ष सावरण्याची शक्यताच नाही असे आम्ही समजत होतो. लोकप्रियता म्हणजे काय? याबावतची आमची समजूत ही भोळीभाबडीच हाती. माझा ओढा समाजवादी पक्षाकडे होता आणि आमच्या नेत्यांच्या व्याख्यानांना जी प्रचंड गर्दी होत असे तो आमच्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकप्रियतेचा निर्विवाद पुरावा होता. सर्व वर्तमानपत्रे काँग्रेस पक्षाच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत बोलत होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांना संघटना निर्माणही करता येत नाही, त्यांना संघटना सांभाळताही येत नाही. महात्मा गांधी वारलेले आहेत. अशा अवस्थेत सरदार पटेल किती प्रमाणात संघटना सांभाळू शकतील याची वानवाच आहे, असे आमचे लोक बोलत असत. इ.स. १९५० साल अखेर सरदार पटेल वारले.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २८