पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टिकणे शक्य नव्हते. तो ओसरून गेला यात काही नवलही नव्हते. शिक्षणावरून माझे लक्ष उडालेलेच होते. तसा मी नाममात्र विद्यार्थी होतो. अभ्यासाची कोणतीही चिंता न करता परीक्षेला बसत होतो. या परीक्षांच्या मध्ये नापास होण्याचीही फारशी क्षिती नव्हती. तसा मी प्रथमच इ.स. १९४९ साली इन्टरला नापास झालो. पण या नापास होण्याचे थोडेसुद्धा दुःख मला वाटलेले आठवत नाही. आपण नापास होणार याची मला खात्री होती. तसे मी सर्वांना सांगितलेलेही होते. निकाल पाहण्याची उत्सुकता नव्हती. उलट जे पास झाले त्यांनाच आपले काही चुकले की काय अशी लाज वाटावी इतका मी आनंदात होतो, हसत खेळत होतो. माझे सर्व नातेवाईक आणि मित्र मला बुद्धिमानच समजत. त्यामुळे मी नापास झाल्याने त्यांना वाईट वाटे. माझ्या आईवडिलांनाही या माझ्या अपयशाची जबर खंत होती. ज्याला नापास होण्याचा विषाद नव्हता असा मीच होतो.

 इन्टरची परीक्षा पास होणे यात मला काही कठीण होते असे नाही. पण मला परीक्षा पास होण्यात रस उरलेला नव्हता. अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचायचेच नाही असे ठरल्यानंतर परीक्षा नापास होणे कठीण नसते. अनेकजण भरपूर अभ्यास करून नापास होत. नापास होण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात हे मला मान्य नव्हते. आणि पास व्हायचेच ठरवले तर परीक्षा पास होण्यात काही अवघड आहे असे मला वाटत नव्हते. गणितात शंभरापैकी शंभर गुण मिळवणारा कुशाग्र विद्यार्थी मी नव्हतो. पण ९२ ते ९५ गुण मला गणितात मिळत असत. अशा प्रकारची पर्वपीठिका असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेची फारशी भीती वाटत नसते तसेच माझेही होते. या नापास होण्यात आपण आयुष्याचा अपव्यय करतो आहोत असेही मला कधी वाटले नाही. पास होण्यात काही अर्थ आहे असेही मी मानले नाही. माझ्या आवडीच्या विषयात-वक्तृत्व स्पर्धेत-बक्षिसे मिळवीत होतो. माझ्या भोवती मित्रांचा एक मोठा गट होता. हे पास होणारे मित्र मला आपला नेता समजत. राजकारणी थोडीफार लुडबूड करणारा मी तरुण होतकरू कार्यकर्ता होतो. अशा त्या अवस्थेत पास-नापास होणे याला माझ्यासाठी कोणतेही महत्त्व नव्हते. बावन्न सालपर्यंत मनाची हीच अवस्था होती.

 या सगळ्या सार्वजनिक जीवनाला एक वैयक्तिक कडाही होती. वयाच्या सतराव्या, अठराव्या वर्षापासून आपली इच्छा असो वा नसो, आपण तरुण होतो

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २६