पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





२.
माळरानावरील कवडसे

 इ. स. १९५२ पर्यंतचा काळ हा स्वप्नाळूपणाचाच काळ म्हटला पाहिजे. या वेळेपर्यंत माझे वयही फारसे नव्हते. वास्तवाचा फारसा विचारही केलेला नव्हता. वास्तवात ज्याला आधार नाही अशा भोळ्या स्वप्नवादाचा काळ माझ्या जीवनात ५२ सालपर्यंत म्हणजे विशीपर्यंत होता. या नंतरच्या काळात मी पुरा पालटून गेलो. याही नंतरच्या काळात मी स्वप्ने पाहिलेलीच आहेत. स्वप्ने पाहण्याचा माझा नांद कधी संपला नाही. आता यापुढे तो कधी संपेल असे वाटतही नाही. पण आता स्वप्ने पाहताना ती स्वप्ने आहेत याचे भानही मला असते आणि वास्तवाचे भानही पुरेसे जागृत असते. खरा स्वप्नाळू माणूस तो की जो स्वप्नाळू असतो पण आपण स्वप्नाळू आहोत याची जाणीव मात्र त्याला नसते. आपल्या स्वप्नांच्यावरील उत्कट प्रेमापोटी स्वप्नांनाच वास्तवता समजण्याची भोळीभाबडी चूक जे करू शकत नाहीत त्यांना स्वप्ने पाहणारे असे आपण फार तर म्हणू. पण स्वप्नाळू म्हणता येणार नाही. माझ्या जीवनातील भाबड्या स्वप्नाळूपणाचा कालखंड विसावं वर्ष संपत असताना संपला.

 १९५२ साल हे माझ्यासाठी प्रचंड यातनांचे आणि भ्रमनिरासाचे वर्ष होते. माझ्या जीवनात इतका दुःखमय काळ पुन्हा कधी आला नाही. इ.स. १९४७ साली मी हैदराबादच्या मुक्ती आंदोलनात सहभागी झालो. त्याचवेळी जून महिन्यात मी मॅट्रीक पास झालो. पोलिस अॅक्शन होईपावेतो ते चौदा महिने गेले त्या १४ महिन्यांत लोकविलक्षण धुंदीत मी वावरत होतो. मरणाची भीती ज्या काळात फारशी कधी वाटलीच नाही असा तो काळ होता. पोलिस अॅक्शन झाल्यानंतर हा धुंदीचा काळ

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन/२५