पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहोत याची जाणीव निर्माण होणे अपरिहार्यच असते. तसा मी लहान वयापासून कथा-कादंबऱ्या वाचीतच होतो. त्यामुळे जिथपर्यन्त शब्दज्ञानाचा संबंध आहे. तिथपर्यंत मी १६-१७ वर्षांचा झालो. यामुळे काही विशेष नवे ज्ञान झाले असे समजण्याचे कारण नाही. स्वामी शिवानंदांची पुस्तके आणि ज्याला अश्लील वाङ्मय म्हणतात असे पुष्कळसे वाङ्मय वयाच्या बाराव्या वर्षीच मी वाचून टाकले होते. पण हे सारे शब्दज्ञान होते. त्या शब्दज्ञानाचे पाठांतर, शृंगार या शब्दाचा अर्थ किंवा वासना या शब्दाचा अर्थ थोडाफार कळू लागला ही अवस्था सतराव्या-अठराव्या वर्षी प्राप्त झाली. मराठवाड्यासारख्या प्रदेशातील संक्रमणावस्थेतील पिढीत मीही होतो. बालविवाह नसावेत, लग्नाच्या वेळी मुलगी किमान चौदा वर्षांची असावी हे मत विलक्षण क्रांतिकारक आणि सुधारकी वाटावे असे वातावरण माझ्या भोवताली होते. माझे वडील त्यामानाने सुधारलेले, त्यांचा कल नव्या विचाराकडे झुकलेला. यामुळे सोळा वर्षांचा झाल्याखेरीज मी माझ्या मुलाचे लग्न करणार नाही असे विचार माझे वडील गंभीरपणे मांडताना मी ऐकलेले होते. यामुळे जेव्हा मी १७-१८ वर्षांचा झालो त्यावेळी आपण आता पुरेसे प्रौढ व तरुण झालो आहोत असे मला वाटू लागले. आणि पाहता पाहता मी एका मुलीच्या प्रेमातही पडलो. आपण फक्त मॅट्रिक पास, त्यानंतरच्या काळात सतत नापास होतो आहोत: आपल्याला नोकरी नाही, आपण बेकार आहोत असे मला मुळी जाणवतच नव्हते. आपण तडफदार पुरोगामी कार्यकर्ते आहोत, तरुण आहोत, तेव्हा प्रेम करण्याचा आपला हक्क आहे, असे निश्चितपणे मला वाटत होते. जिच्यावर आपण प्रेम करतो आहोत तिची आकलनशक्ती किती याचाही पोच मला नव्हता आणि प्रेम करणे म्हणजे नेमके काय हेही मला कळत नव्हते. माझी पत्नी असणारी व्यक्ती त्यावेळी अजून वयात न आलेली केवळ लहान मुलगी होती. तिला काही कळत होते की नाही याचाही पत्ता नव्हता. ही आमची प्रेयसी आणि चोरून भेटण्याचा प्रयत्न करणे, चोरून बोलणे, अगर पत्र लिहिणे हे सगळेच थिल्लरपणाचे प्रकार आहेत, सबब ते वर्ज्य समजावेत असे आमचे या क्षेत्रातील अफाट व्यवहारज्ञान ! न भेटता, न बोलता, पत्र न पाठवता आमचे प्रेम चालू होते. प्रेयसीला ते प्रेम कळाले की नाही आणि तिने ते स्वीकारले की नाही या दोन्ही बाबी गौण समजाव्यात असे मानणारे गडकऱ्यांच्या कवितेत रमणारे असे अव्यवहारी मन मजजवळ होते. न बोलता, न भेटता मी प्रेमात पडलो होतो. या प्रेमाचे रूपांतर लग्नात होईल काय? या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन/२७