पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असणारा भाग आहे. औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता इथे आहे. मराठवाडा आणि उरलेला महाराष्ट्र यात विकासाची फार मोठी दरी आहे. मुंबई विद्यापीठ इ.स. १८५६ सालचे तर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५८ चे. अंतर कुणालाही कळावे इतक उघड आहे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ३४५ असते तेव्हा मराठवाड्यात ते दरडोई फक्त १७४ रुपये असते. मराठवाडा मागासलेला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा सर्वांच्या बरोबरीने यावा हे लवकर, झटकन घडणारे कार्य नाही त्याला उशीर लागेल हे मान्यच आहे. पण उशीर लागेल म्हणजे किती उशीर लागेल? माझे एक मित्र म्हणाले, हे अंतर भरून काढण्यास ५० वर्षे लागतील. मी म्हटले माझी हरकत नाही. मी ५० वर्षे थांबण्यास तयार आहे. पण महाराष्ट्राशी जेव्हा आम्ही संलग्न झालो तेव्हा लोक म्हणत हे अंतर भरून काढण्यास ५० वर्षे लागतील. १९५६ ते आजतागायत या आश्वासनाचा जवळपास निम्मा भाग संपला आहे. २५ वर्षांत हे अंतर कमी किती झाले? ५० टक्के कमी झाले असेल तर फारच चांगले. हे अंतर ३०/४० टक्के कमी झाले असेल तरी मी निराश होणार नाही. सत्य असे आहे की मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यातील अंतर गेल्या २५ वर्षांत कमी झालेले नाही. उलट हे अंतर वाढलेले आहे. तक्रारीचा मुद्दा हा आहे. महाराष्ट्र एकात्म व्हायचा असेल तर महाराष्ट्राच्या विविध भागांतले अंतर कमी व्हायला हवे. ते जर वाढत असेल आणि याबाबत कोणतीही अपराधाची जाणीव महाराष्ट्रात नसेल तर मग आमची तक्रार आहे. हा बेदरकारपणा महाराष्ट्राच्या अस्तित्वालाच धक्का लावील. जे आम्ही निर्माण केले ते केवळ बेजबाबदारपणे वागल्यामुळे धोक्यात येईल याची खंत आम्हाला आहे. आणि आम्ही असा महाराष्ट्राच्या एकात्मतेचा विचार करतो याचा अभिमानाही आहे.

 मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हाला भाग पाडले जात आहे ह्याची.

***

(व्याख्यानाचा हस्तलेख-बहुधा अमुद्रित.)

हैदराबाद-विमोचन आणि विमर्जन / २४