पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या संस्थानात नवीन व्यवस्था लावली. पूर्वीचे वसूल करणारे गुत्तेदार बाद करून त्यांनी पगारी नोकर निर्माण केले. हैदराबाद संस्थानची एकूण सोळा जिल्ह्यांत विभागणी करून प्रत्येक जिल्ह्यावर एक एक पगारी कलेक्टर नेमला. या सोळा जिल्ह्यांचे त्यांनी मराठी बोलणारे, कानडी बोलणारे असे एक एक व तेलगू बोलणारे दोन असे एकूण चार सुभे केले. या प्रयत्नात हैदराबाद संस्थानातील मराठी बोलणारा प्रदेश एक सुभा म्हणून बनला. हा सुभा म्हणजे मराठवाडा. मूळ मुसलमानी पद्धतीने उच्चार करायचा तर मऱ्हेटवाडी. मराठी लोकांचा प्रदेश.

 आम्ही निजाम राजा राहावा याला विरोधी होतो. राजेशाहीच्याच विरोधी होतो. मोगली साम्राज्याचा हा शेवटचा अवशेष शिल्लक राहावा हेही आम्हाला नको होते. आम्हाला भारताचा एक प्रांत म्हणून हैदराबाद संस्थान शिल्लक रहावे हे नकोच होते. हैदराबादने भारतीय संघराज्यात विलीन व्हावे हा आमच्या मागणीचा फक्त पहिला टप्पा होता. या संस्थानाचे तीन भाषावार तुकडे करून मराठवाडा महाराष्ट्राला जोडावा आणि संपूर्णपणे एकात्म महाराष्ट्र निर्माण व्हावा ही आमची आकांक्षा. ही आकांक्षा पूर्ण व्हायची म्हटल्यानंतर मराठवाडा या वेगळ्या अस्तित्वाची तरी गरज काय? आम्ही महाराष्ट्रात बिनशर्त सामील होणाऱ्यापैकी आहोत. तेव्हा मराठवाडा हा शब्द निरर्थक व्हावा हीच आमची आकांक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बनले. पण ते ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीमुळे मराठवाडा हा शब्द निरर्थक व्हावा ही जी आमची इच्छा ती मात्र पूर्ण झालेली नाही. लवकर पूर्ण होईल असे दिसतही नाही.

 मराठवाडा हा शब्द निरर्थक झाला पाहिजे असे आम्ही म्हणतो त्यावेळी एकात्म महाराष्ट्र निर्माण व्हावा आणि महाराष्ट्राच्या सर्व विभागांत असा एकजीवपणा निर्माण व्हावा की वेगळेपणा सांगण्याची गरजच वाटू नये असे आम्हाला अभिप्रेत असते. मराठवाडा शब्द निरर्थक व्हावा ही आमची इच्छा महाराष्ट्र एकजीव व्हावा या ध्येयवादाशी निगडीत आहे. आपले पृथक अस्तित्व टिकवून धरण्यासाठी झटणारी वेगळिकीची भावना इथे प्रबल नाही. इच्छा नसताना आम्ही महाराष्ट्रात आलेलो नाही. इच्छा नसताना महाराष्ट्रात अडकून पडलेलो नाही. आम्ही स्वेच्छेने, आग्रहाने व हट्टाने महाराष्ट्रात आलो. कारण आम्ही महाराष्ट्रातच आहो ही आमची उत्कट जाणीव आहे. जनतेच्या स्मृती फार अल्पकालीन असतात नाही तर आमच्या हट्टामुळे महाराष्ट्र झाला. एरवी तो अस्तित्वात आला नसता याची आठवण लोक विसरले नसते.

 मराठवाडा या शब्दाची आम्हाला लाज वाटत नाही. वाटतो तो अभिमान.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २०