पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१.
माझा मराठवाडा

 मराठवाडा या शब्दाला एका बाजूने पाहिले तर फार अर्थ आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले तर या शब्दाला काहीच अर्थ नाही. आम्ही मंडळी हा शब्द सार्थ म्हणून शिल्लक उरावा या मताची नाही. हा शब्द निरर्थक व्हावा या मताची आहोत. जन्मभर आमच्या नेत्यांनी जी धडपड केली ती हा शब्द सार्थ असावा म्हणून नाही तर तो शब्द निरर्थक व्हावा म्हणून. पण अजून नियतीची इच्छा हा शब्द निरर्थक व्हावा अशी दिसत नाही. ठीक आहे. मराठवाडा शब्द अर्थपूर्ण असणेही आम्हाला मान्य आहे. कारण आम्ही त्या शब्दाला अस्मितेचा अर्थ दिला आहे.

 मराठवाड्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आणि पुढे पेशव्यांनी टिकविलेले, वाढविलेले मराठी राज्य नसते तर मग मराठी बोलणारा सगळा भाग हा मोगलांच्या दक्षिण सुभ्याचाच भाग झाला असता. त्याचा वेगळा मराठवाडा म्हणून उल्लेख करण्याची गरज नव्हती. पेशव्यांना जर वेळोवेळी मिळालेले विजय पचविण्याची क्षमता असती तरी मराठवाडा निर्माण झाला नसता. पेशवाईचा पाडाव झाल्यानंतर आणि फौजांच्या खर्चासाठी जो वऱ्हाड इंग्रजांनी तोडून घेतला तो देऊन झाल्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हैदराबाद संस्थानला एक दिवाण सालारजंग म्हणून मिळाले. जेवढे राज्य निर्माण करण्याची पहिल्या निजामाची इच्छा होती, आणि मागोमाग जेवढे राज्य निर्माण करण्यात नंतरचे निजाम गुंग होते त्या साऱ्याचा नाद सोडून सालारजंगांनी हैदराबादचे जे संस्थान शिल्लक उरले होते त्याची व्यवस्था लावली. जाता जाता सर्वांचे लचके तोडून झाल्यावर जे संस्थान शिल्लक उरले होते तेही भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. सालारजंगांनी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / १९