पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिमानाने आणि गर्वाने सांगावे असे आमच्या जवळ किती तरी आहे. मराठवाडा नावाचे काही लांच्छन आहे व ते आम्ही विसरू इच्छितो अशी मुळीच गोष्ट नाही. मराठवाडा हा अभिमान व गौरवाचा भाग आहे पण महाराष्ट्रात तो आम्ही विलीन करू इच्छितो असे आमचे म्हणणे आहे. मात्र ही क्रिया प्रेमानेच होणार. तुम्ही मराठवाड्याचा पराभव करून हे घडवून आणू शकणार नाही. पराभव करण्याचे प्रयत्न फक्त कटुता वाढवतात, वेगळेपणाची जाणीव बळकट करतात.

 मराठवाड्याजवळ अभिमान बाळगण्याजोगे खूप आहे. आद्यकवी मुकुंदराज ' आणि ज्ञानेश्वर यांच्यावर अजून वाद चालू आहेत, ते जरूर चालू द्या. पण नामदेव, जनाबाई, गोराकुंभार, एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास हे तर आमचे आहेत. महानुभाव पंडित नरेन्द्र भास्कर तर मराठवाड्याचे आहेत. सातवाहनाची राजधानी पैठण आणि यादवांची राजधानी देवगिरी ही ठिकाणे तर मराठवाड्यात आहेत. पुष्कळ वेळेला ठळक बाबींची नोंद मुद्दाम करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे वेरूळच्या पाटलांचे. महाराजांच्या मागे आपले पुण्य उभा करणारा रामदास जांबेचा. महाराजांना क्षत्रिय ठरवून राज्याभिषेक करणारा गागाभट्ट पैठणचा. महाराजांचे उपपंतप्रधान अण्णाजी दत्तो मराठवाड्याचे, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे हे बिलोली जवळ नांदेड जिल्ह्यातले म्हणजे मराठवाड्याचे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरवासिनी. आणि तीन ज्योतिर्लिंगे - वेरूळ, औंढा नागनाथ, परळी- मराठवाड्यात. वेरूळचे कैलास लेणे व अजिंठ्याची चित्रकला इथली. साहित्याचा, संस्कृतीचा केवढा तरी गौरवशाली अभिमानास्पद वारसा मराठवाड्याचा आहे. त्या वारसाचा रास्त अभिमानही आम्हाला आहे. पण आमचा शिवाजी सर्व महाराष्ट्र आपला मानणारा आहे. तो मराठवाड्याचे वेगळेपण सांगणारा नाही याचा अभिमान आम्हाला जास्त आहे.

 फार जुन्या इतिहासातल्या गोष्टी सांगण्याने वर्तमानकाळातं निभाव लागणार नाही हे मलाही कळते. शिवाजीने निर्माण केलेल्या मराठी राज्याचे लाभ तर महाराष्ट्राला झालेच. पण पेशवाई बुडाली आणि इंग्रजांचे राज्य आले याचेही लाभ महाराष्ट्राला मिळाले. हे लाभ आम्हाला मिळाले नाहीत. निजामाच्या राजवटीत आम्ही दडपलेले राहिलो. हे आमचे ऐतिहासिक कारणामुळे निर्माण झालेले मागासलेपण आहे. तेही आम्ही नाकारत नाही आणि या आमच्या ऐतिहासिक मागासलेपणालां इतर कुणी जबाबदार आहे असे आम्हां समजत नाही. वर्तमानाचे भान आमच्या मनात आहे पण ते आकसशून्य आहे. निजामाच्या राजवटीत आम्हाला अडकून पडावे लागले याबद्दल

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २१