पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाचे वाटते. व्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी कुणाचे जास्त कमी कौतुक केले तर आमचे त्याच्याशी भांडण नाही.

 १९४६ ला स्टेट काँग्रेसची बंदी उठल्यानंतर राजकीय चळवळीला तुफान आले. या संदर्भात कुरुंदकरांच्या नजरेतून निसटलेली एक गोष्ट जाता जाता येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे हैदराबाद राज्यातील, शहरातील, खेड्यातील, सर्व थरांतील, सर्व व्यवसायांतील मंडळींनी प्रगट केलेला निर्धार. या सर्वांची कुणीतरी कोठेतरी दखल घ्यायला हवी. सरकारी नोकरीत नसणारे प्रक्षोभाने पेटलेले असत, तर नोकरीत असलेलेही प्रक्षोभाने पेटलेले असत. वरून शांत वाटणारा ज्वालामुखीचा हा पर्वत आतून खदखदत होता. अत्याचाराला प्रतिकार करतानाही तो लाव्हा प्रकट होत होता. सीमा भागात सशस्त्र आंदोलनातही प्रगट होत होता. हा सबंध असंतोष व्यापक, खोल व दीर्घकालीन असल्यामुळेच भारत सरकारला हैदराबादेत शिरणे शक्य व सोपे झाले. १९४६ च्या सुमारास हैदराबाद राज्यातील वकिलांनी कोर्टावर बहिष्कार घालण्याची जी चळवळ केली तीही अजोड होती. कागदपत्रांच्या, पुराव्यांच्या, पंचनाम्यांच्या, छायाचित्रांच्या, वृत्तान्तांच्या आधारे त्यांनी हिंदू जनतेवरील अत्याचार दिल्लीला पोचविले व त्याचा नंतर सर्वत्र प्रसार झाला. पोलिस कारवाईसाठी ते एक सबळ कारण ठरले हेही नमूद करायला हवे. ह्याच वकील मंडळींनी भारत सरकारला वेळोवेळी दिलेल्या वृत्तान्ताच्या आधारेच श्वेतपत्रिकेचा मजकूर पुरविला. हे काम जिकिरीचे, चिकाटीचे व धैर्याचेही होते. इतिहासात त्याची नोंद व्हायला हवी व योग्य मूल्यमापनही व्हायला हवे म्हणून हा सबंध कालखंड केवळ प्रक्षोभपूर्व म्हणून भागणारे नाही, तर सबंध समाजच्या समाज काळाला आव्हान देत उभा राहिला म्हणून महाकाव्याचा अंश होय.

 हैदराबादच्या इतिहासाच्या संदर्भातील काही मुद्द्यांचा ऊहापोह कुरुंदकरांच्या विवेचनाच्या संदर्भात केला. हा विषय त्यांच्या व आमच्याही जिव्हाळ्याचा. त्या विषयावर कितीही लिहिले, बोलले तरी कमीच वाटेल. पण या सर्व लेखनातून हैदराबादच्या एकूण इतिहासाकडे पाहण्याची अभ्यासकांची, वाचकांची दृष्टी विस्तारावी म्हणून हा प्रपंच केला. वाचक कुरुंदकरांच्या ह्या ग्रंथाचे प्रेमाने स्वागत करतील असा भरवसा वाटतो.

द.पं जोशी,
'माऊली', ३-४-१०१३/२६/
वरकतपुरा, हैदराबाद ५०० ०२७.