पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे." त्याने असेही सांगितले की : “मूर्तिपूजा करणारे, जनावरांची पूजा करणारे, जनावरांचे शेण खाणारे जे हिंदू लोक आहेत त्यांची गणना आम्ही माणसांत करणार नाही. या माणसांची गणना जनावरात करणे आवश्यक आहे." रझवीने जाहीर सभेमध्ये हेही सांगितले होते की "तुम्ही हैदराबादमध्ये यायचा प्रयत्न केला तर आमचे वीस लक्ष मुसलमान (हा आकडा रझवीचा. मुसलमान वीस लक्ष नव्हते.) एक कोटी चाळीस लाख हिंदूंची कत्तल करतील. आणि त्यानंतर रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत लढतील. यानंतर कधीकाळी हैदराबाद जिंकून आत आलात तर आतमध्ये प्रेतांच्या ढिगाऱ्याशिवाय काही दिसणार नाही." रझवीने कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही. तो जीनाप्रमाणे बॅरिस्टर नव्हता, की चतुरभाषी नव्हता. तो बेजबाबदार बोलण्यासाठीच होता. खरे तर बडबडण्यापलीकडे कासिम रझवीच्या हातात काही नव्हते. मागच्या सगळ्या नाड्या मंत्रिमंडळात असणारे लायकअली (मुख्यमंत्री), त्यांच्या सहकाऱ्यांमधील रऊफ महमद यामीन झुबेरी आणि मोईन नबाब जंग यांच्या हातात होत्या. आणि याखेरीज झैनयार जंग, दीनयार जंग व शेवटी या सर्वांच्या नाड्या धरणारे स्वतः निजाम उस्मान अलीखा बहादुर यांच्या हातात. तेव्हा खरे सूत्रधार निजामच होते. कासिम रझवी हा फक्त बेजबाबदार व्याख्याने देण्यासाठीच होता.

 रझवी किती मूर्ख होता याचे एक उत्तम उदाहरण मी सांगतो. रझवी एके दिवशी उठला आणि वल्लभभाई पटेलांच्या भेटीला गेला. रझवी आणि वल्लभभाई यांची ही जी भेट झाली तिची माहिती कन्हैयालाल मुनशी यांनी 'End of an Era' या पुस्तकात नोंदलेली आहे. पण मुन्शी यांनी ही जी माहिती नोंदलेली आहे त्यापेक्षा माझ्याकडे असलेली माहिती वेगळी आहे. मुन्शींनी काय नोंदविले होते ते त्यांच्या पुस्तकात वाचा. माझ्याकडे काय माहिती आहे ती मी आपल्याला सांगतो. ही माहिती कोणत्याही पुस्तकात नोंदविलेली नाही. कार्यकर्त्यांच्याद्वारे आलेली आहे. अधिक स्पष्ट बोलायलाही हरकत नाही. रामानंद तीर्थांना जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगतो. ती माहिती अशी आहे : कासिम रझवी अचानकच विमानात बसले आणि दिल्लीला जाऊन पोहोचले. एका हॉटेलात जाऊन उतरले. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात असणारे जोशी नावाचे गृहस्थ होते. हे ते जोशी ते जालन्याचे व्यापारी आणि गुजराथी होते. हे लायकअली मंत्रिमंडळात हिंदूंचे प्रतिनिधी होते. हे दोघे हॉटेलमध्ये उतरले आणि त्यांनी वल्लभभाईना फोन केला. जोशी फोनवर म्हणाले की रझवीचे असे मत आहे की एकदा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१७