पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्ही खतम करून टाकू. आमच्या विरुद्ध जे हात लेखणी उचलतील ते आम्ही कापून टाकू. त्याच्या दुसऱ्या दिवशी शोईबुल्लाखान यांनी अग्रलेख लिहिला. त्यात म्हटले की शोईबुल्लाखानाला मृत्यूची भीती दाखविणारा कासिम रझवी हा मूर्ख माणूस असला पाहिजे. शोईबुल्लाखान मृत्यूची तयारी ठेवूनच बसला आहे. त्याला मृत्यूची भीती असती तर तो भूमिगत झाला असता. तो सत्याग्रह करून तुरुंगात गेलेला नाही. भूमिगत झालेला नाही. उघड्यावर बसला आहे. सडकेवर हिंडतो आहे. तो जाणीवपूर्वक मृत्यूला तयार आहे. तेव्हा आपले शौर्य दाखविण्यासाठी रझवीने त्याला मृत्यूची भीती दाखवू नये. शौर्य दाखविण्याची इच्छा असेल तर रझवीने तो जे हैदराबादला बोलतो ते दिल्लीला येऊन बोलण्याची हिम्मत दाखवावी. या अग्रलेखाचा परिणाम असा झाला की कासिम रझवीने आपल्या पित्तूंना सांगितले, “याला ठार मारा". म्हणून रझाकारांनी शोईबुल्लाखानवर भर रस्त्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. हे शोईबुल्ला आमचे शेवटचे हुतात्मे. पहिले पानसरे. पानसरे यांपासून शोईबुल्लापर्यंत हुतात्म्याची एक मोठी लांबरुंद परंपरा आहे. आपण मरायला तयार नाही असे सांगत असताना ज्यांना रझाकारांनी मारले त्यांनाही आपण शिष्टाचार म्हणून हुतात्मे म्हणतो. मी जी नावे सांगत आहे त्यांनी स्वेच्छेने मागून मृत्यू पत्करला आहे. जे इच्छा नसताना मारले गेले त्यांच्याविषयीही मला आदरच आहे. पण त्यांची नावनिशीवार यादी सांगता येणार नाही.

 मुस्लिम लीग हिंदुस्थानच्या राजकारणात होती. जीना लीगचे नेते होते. ते पुरेसे जातीयवादी होते, कर्मठही होते. पण जीनांची जाहीर सभेतील व्याख्याने नेहमी कायद्याच्या चौकटीत बसणारी असत. त्यांच्या धमक्या शर्करावगुंठित छुप्या भाषेत असत. चौपाटीवर उभ्या असलेल्या बेजबाबदार दारुड्या मुसलमानाच्या भाषेत जीना कधी वोलले नाहीत. पण कासिम रझवी आयुष्यभर त्याच भाषेत बोलला. तो गांधींना उद्देशून म्हणाला, “जे बनिये आणि व्यापारी आहेत त्यांना सत्ता सांभाळता येणेच शक्य नाही. त्यांनी आपला कास्टा सांभाळला तरी पुरे." पुढे चालून त्याने असेही सागितले की : “तुम्ही हैदराबादकडे वाकडी नजर करण्याची ताकद दाखविणे बरोबर नाही. तशी नजर तुम्ही केली तर आम्ही संतापल्यावर इकडे घुसू की मद्रास जिंकू, तिकडे घुसू की मुंबईच जिंकू. यानंतर आमच्या फौजा चालत निघतील त्या दिल्लीपर्यंत येतील. दिल्लीच्या किल्ल्यावर आसफजाही झेंडा फडकावणे हे माझ्या जीवनाचे ध्येय

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१६