पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हाला ठणठणीतपणे सांगितले पाहिजे की तुम्ही हैदराबादला यायचा प्रयत्न कराल तर फुकट मराल. कारण इकडे आम्ही सगळे हुतात्मे व्हायला बसलो आहोत. कासीम रझवीचे प्रसिद्ध वाक्य असे - 'सरको कफन बांधे मुजाहिद बन बैठे है.' म्हणजे आम्ही प्रेतवस्त्रच डोक्याला गुंडाळून हुतात्मे होण्याकरिता बसलो आहोत.

 रझवीचा फोन वल्लभभाईचे सचिव शंकर यांनी घेतला. नंतर त्यांनी रझवीचे म्हणणे वल्लभभाईंच्या कानावर घातले. वल्लभभाईंसंबंधी आपणा सर्वांच्या डोक्यात असलेली प्रतिमा आपण बदलून घ्यायला पाहिजे. वल्लभभाई अतिशय खंबीर, दृढनिश्चयी होते. पण शिष्टाचाराचे सर्व नियम पाळणारे होते. त्यांनी शंकरना सांगितले : शहरात जातीय दंगली चालू आहेत. रझवी हॉटेलमध्ये उतरले आहेत ही बातमी बाहेर फुटली तर फुकट मारले जातील. तरी हत्यारबंद पोलिसांची चिलखती गाडी पाठवा. त्यांना सरकारी अतिथिगृहावर आणा. शाही पाहुणे म्हणून वागवा. दिवस शुक्रवारचा आहे. त्यांना विचारा नमाज पढायला जायचे का? जाणार म्हणाले तर जामा मसजिदमधील दुपारच्या नमाजाला त्यांना हजर ठेवा. त्यांचे जेवणखाण, विश्रांती नीट सांभाळा, मी त्यांना रात्री भेटेन.

 त्याप्रमाणे कासिम रझवी हा वल्लभभाईंच्या भेटीला आला. वल्लभभाई दरवाज्यामध्ये रझवीच्या स्वागताला उभे होते. वल्लभभाईंनी रझवीच्या मोटारीचा दरवाजा उघडला आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. रझवी खाली उतरल्याबरोबर बोलू लागला. तेव्हा वल्लभभाई म्हणाले, “तुम्हाला बोलण्यासाठी वेळ मिळेल. आपण आधी शिष्टाचार पुरे करू." वल्लभभाईंच्या बंगल्याच्या एका बाजूला हिरवळ होती तेथे वल्लभभाई त्याला घेऊन गेले. त्यानंतर वल्लभभाई म्हणाले, “ही जागा मोठी प्रेक्षणीय आहे. इथून निसर्गदृश्ये चांगली दिसतात. कधीकाळी आपण दिवसा आलात तर मी ती दाखवीन." मग त्यांनी रझवीच्या बायकामुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याला प्यायला सरबत दिले आणि चांदीचा वर्ख लावलेला एक विडा स्वतःच्या हाताने त्याला दिला. नंतर वल्लभभाई म्हणाले, "ठीक आहे. आता बोला."

 रझवी उभा राहिला आणि बोलायला लागला. तेव्हा सरदार पटेल म्हणाले, "तुम्ही बसून बोलू शकता." "मला उभ्याने बोलण्याची सवय आहे. तेव्हा मी बसून बोलत नाही." म्हणून रझवी बोलू लागला. तो एक तासभर व्याख्यान देण्याच्या आवाजात बोलत होता. या बोलण्यात त्याने हिंदुस्थान सरकारला धमक्या दिल्या. त्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१८