पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सदुसष्ट टक्के हिंदू होते आणि तेहतीस टक्के मुसलमान होते. निजामाने नव्याने सुशिक्षित झालेल्या मुसलमानांची नोकरभरती करावयास सुरुवात केली. एकोणीसशे तीसपर्यंत निजामाने सर्व परिस्थितीची उलटापालट केली. हिंदूंचे प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत खाली आणले. मुसलमानांचे प्रमाण सत्तर टक्क्यापर्यंत वर चढविले. आठराशे त्रेपन्न साली तेव्हाच्या निजामाचे लष्कर वीस हजाराच्या आसपास असावे. याची वाढ उस्मानअलीच्या वेळपर्यंत सत्तर हजारापर्यंत झाली होती. पण हे सर्व लष्कर बिनकवायतीचे, बुणग्याच्या स्वरूपाचे होते. निजामाने हे लष्कर बरखास्त केले. या लष्करामध्येच अरब, रोहिले, पठाण यांची भरती होती. त्यांना निवृत्त केल्यावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे निजामाने सावकारीचे प्रोत्साहन देऊन. सर्व संस्थानात पसरविले आणि सावकार मुसलमानांचे एक साम्राज्यच निर्माण केले. आपण सावकारीतून नोकराकडे व नोकराकडून सावकाराकडे असे आंदोलन करीत आहो. आता आधी नोकरांचा विचार पुरा करू. तीस साली हिंदू नोकऱ्यांत तीस टक्क्यांपर्यंत घसरले. निजाम नोकरांच्या प्रमाणावरील नियंत्रण शिक्षणावरील नियंत्रणातून अंमलात आणीत होता. त्याचा आता विचार करू.

 निजामाच्या काळात शंभर प्राथमिक शाळांच्या चार हजार प्राथमिक शाळा झाल्या हे पूर्वी सांगितले, हे खरे आहे. पण याचा अर्थ शिक्षणाला मुक्त स्वातंत्र्य होते असा नाही. शिक्षणाचे प्रमाण काय असावे हे निजामाने मनात पक्के ठरविले होते. हे अलिखित व अनधिकृत असे आदर्श प्रमाण दहा टक्के प्रजा शिक्षित असावी असे होते. प्रत्यक्षात हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत त्याने कधी पोचू दिले नाही. परंतु ती आदर्श प्रमाणाची त्याची मर्यादा होती. आता हे दहा टक्के प्रमाण कशाचे? तर प्राथमिक शिक्षणाचे. प्राथमिक शिक्षणाचेच हे प्रमाण मर्यादित केल्यावर त्यातून माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण खाली घसरणार व त्यातून उच्च शिक्षणाचे प्रमाण आणखी खाली घसरणार. उच्च कॉलेज शिक्षणाचे हे प्रमाण पाव टक्क्याच्या (१/४%) वर जाऊ नये असेच धोरण निजामाने आखलेले होते. या धोरणासाठीच उस्मानिया विद्यापीठ अस्तित्वात आले; निजाम कॉलेज अस्तित्वात आले. पण सर्व संस्थानात पदवी घेण्याची अथवा उच्चतर शिक्षण घेण्याची सोय फक्त या दोनच ठिकाणी ठेवण्यात आली. इतर कुठेही पदवीचे कॉलेज नव्हते. काही ठिकाणी इंटरमीजिएट कॉलेजे होती. उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही शहरात या. शिवाय शिक्षण फक्त उर्दूमधून. म्हणजे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८७