पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानांना अधिक सुगम. या धोरणाने आपोआपच असे नियंत्रण राहिले की, साक्षरांच्या मध्ये हिंदू व मुसलमान यांचे प्रमाण सारखे. मॅट्रिक पातळीवर मुसलमानांचे प्रमाण काही टक्के जास्त, उच्च शिक्षणात दोन भाग मुसलमान तर एक भाग हिंदू असे प्रमाण आपोआपच स्थिर झाले. हिंदूंना तर सगळ्या शहाणे करावयाचे नाहीच पण मुसलमानांनाही सगळ्याच शहाणे करावयाचे नाही. कारभाराला आवश्यक तेवढेच लोक उच्च शिक्षित होऊ द्यायचे. गरज असेल तेवढे लष्कर, गरज पडेल तेवढेच पोलिस. गरज पडेल तेवढेच बँकर्स ! सर्वच जनतेला शहाणे करून राजसत्ता धोक्यात आणण्याच्या भानगडीत पडावयाचे नाही.

 यापुढे जाऊन नोकरवर्गाच्या दोन जाती ठरविल्या. एक ओहदे कुलिया आणि दुसरी ओहदे गैरकुलिया. ओहदे कुलिया म्हणजे मोक्याची पदे. (Key Posts, Gazetted Posts) तहसिलदार, त्यांच्या वरचे अधिकारी, पोलिसांचे ज्येष्ठ अधिकारी, जमिनीची खरेदी-विक्री नोंदणारे रजिस्ट्रार्स, न्यायालयाचे अधिकारी सगळेच मोठे अधिकारी हे ओहदे कुलिया. यात पंचाण्णव टक्के प्रमाण मुसलमानांचे व पाच टक्के प्रमाण मुसलमानेतरांचे ठरले. हैदराबाद शब्दांच्या कोशात हिंदू असा शब्द नव्हता. मुसलमान आणि मुसलमानेतर अशी सारी रचना चालावयाची. मुसलमानेतरांमध्ये हिंदूही येत, लिंगायतही येत, पारशी येत, जैन येत, शीख येत, ख्रिश्चन येत, अस्पृश्यही येत. जितके येणार असतील तितके येतील. हे सगळे मुसलमानेतर धरायचे व पाच टक्क्यांत बसवायचे. प्रत्यक्ष लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण शहाऐंशी टक्के होते. मुसलमान अकरा टक्के होते. इतर तीन टक्के होते. मोक्याच्या नोकऱ्यांत मुसलमान पंचाण्णव टक्के आणि इतर सारे पाच टक्के अशी वाटणी होती. इतर ज्या शाळामास्तर, चपराशी असल्या पातळीच्या म्हणजे ओहदे गैरकुलिया जागा होत्या त्यात हिंदूंना वाव द्यायचा. तो अधिकृत भाषेत पंचाहत्तर टक्के मुसलमान आणि पंचवीस टक्के मुसलमानेतर. म्हणजे एकूण शिक्षण आणि नोकऱ्या याची परिस्थिती पाहा. साक्षरतेचे प्रमाण दहा टक्के. उच्च शिक्षणाचे प्रमाण पाव टक्का. हा आदर्श तसाच नोकरीच्या प्रमाणातील टक्केवारीचाही आदर्श. जनतेत जास्त जागृती येऊ द्यावयाची नाही. तरीही साऱ्या जगातील सारे आधुनिक ज्ञान स्वतःच्या संस्थानची सत्ता वाढविण्यासाठी वापरायचे अशी ही अत्यंत धोरणाने आखलेली व अंमलात आणलेली योजना आहे. ती रचना जनतेचे कल्याण कसे करता येईल यासाठी नाही.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८८