पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निजामाच्या जेव्हा हे लक्षात आले की, हा प्रश्न सहजासहजी सुटणारा नाही तेव्हा त्याने एक नवी भूमिका घेतली. ती अशी की, हैदराबाद संस्थानात जनतेची एक संघटना पाहिजे, आणि ती संघटना आपल्याशी हितसंबंध ठेवणारी असली पाहिजे. हे ठरविल्यावर निजामाने काही नवी रचना सुरू केली. जे जहागिरदार होते त्यांच्याशी नव्याने संबंध प्रस्थापित करायला आरंभ केला. राजा किसनप्रसाद, राजा रायरायान, महेबूब करवा बहाद्दर, इंद्र करुणबहादूर यांशी त्याने नवे संबंध जोडले. हैदराबादमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्गाचे कितीतरी हिंदू जहागीरदार आहेत. यांतील एकही हिंदू कधी निमाजाच्या विरुद्ध गेला नाही. हे सारेच्या सारे सदैव निजामाचे राज्य व जहागीरपद्धती कायम असावी याच बाजूचे राहिले.

 प्रत्यक्ष आंदोलन चालू झाले तेव्हा देशमुख आणि पाटील या आडनावाची मंडळी मात्र आंदोलनात आपापले घरवतन सोडून आली. माझी माहिती बरोबर असेल तर परभणी जिल्ह्यामधे वाशिमला भूमिगतांचे एक केंद्र चालू होते. या वाशिममध्ये एक पत्रक निघालेले आहे ते मीच वाटलेले आहे. या पत्रकात उल्लेख आहे की परभणी जिल्ह्यातील तीनशे पाटील / पांडे मंडळी आपली घरेदारे सोडून लढ्याला पाठिंबा देऊन आपणात सहभागी झालेली आहेत. हे जे वतनदार आमच्याबरोबर आले ते कोणते आले? पांडे, कुलकर्णी, पाटील, पोलिस-पाटील, नुसत्या आडनावाचे देशमुख. यापेक्षा जास्त मोठा हिंदु वतनदार आमच्याबरोबर कोणी नव्हता. राजे सोमेश्वरराव, वनपातींचे राजे यांची सहानुभूती आम्हालाच होती असे निरनिराळ्या लोकांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली, पण ते पोलिस कारवाई यशस्वी होऊन निजाम संपल्यावर. पण प्रत्यक्षात एकही मोठा वतनदार आमच्याबरोबर आला नाही. एकही मोठा जमीनदार आला नाही. कारण या हिंदू प्रजेची सहानुभूती गमावली जाणार नाही याची काळजी निजामाने घेतलेली होती. याचे एक गमक म्हणून अगदी शेवटची गोष्ट सांगायची असेल तर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात भारत सरकारचे त्या वेळचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना हैदराबादमधून दहा हजार तारा गेलेल्या आहेत. त्या सर्व संस्थानातील प्रमुख हिंदूंच्या सह्यांच्या आहेत. तारांमध्ये एकच मजकूर आहे की येथे शांतता आहे. वर्तमानपत्रातील बातम्या चुकीच्या आहेत. आम्ही निजामाच्या राज्यात अत्यंत सुखी आहोत. राजकीय भूमिका कशीही सोडवा. पण येथे जनतेचे जीवन धोक्यात आहे ही भूमिका चुकीची आहे हे लक्षात घ्या.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७६