पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विशेष म्हणजे पुढे काँग्रेसच्या राजकारणात जी मंडळी फार मोठ्या पदावर गेली त्यांतील अनेकांच्या सह्या या तारांवर आहेत. ती माणसे हयात असल्याने त्यांची नावे सांगणे शिष्टाचाराला सोडून होईल. नाही तर त्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांतील पाच-पन्नास जणांची यादी माझ्याजवळ तयार आहे. मुद्दा एवढाच आहे की, निजामाने बड्या हिंदूंची सहानुभूती सांभाळलेली होती. काही उदाहरणे म्हणजे हैदराबाद संस्थानातील आपल्यातील प्रमुख व्यापारी म्हणजे पित्ती घराणे. यात पन्नालाल पित्ती हे निजामाच्या खास विश्वासातले. इतके की त्यांना निजामाने अनेकदा मंत्रिमंडळात बोलाविले. आरंभी ते आले नाहीत. पण शेवटी आले तेव्हा शेवटचे मंत्रिमंडळ शपथ घेऊच शकले नाही. प्रत्यक्ष स्टेट काँग्रेसच्या आतच निजामाचा पाठीराखा एक मतकक्ष होता. हा स्टेट काँग्रेसमधूनच निजामाच्या बाजूने विचार करीत असे. या कक्षातील हे निजामाचे पाठराखे कोण होते हे आता सांगणे बरोबर होणार नाही. कारण आपल्यापैकी कोणी कोणी मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसले याची यादी देणे योग्य होणार नाही. पण एका माणसाचे नाव सांगितलेच पाहिजे. आमचा लढा चालू होता. वीस हजार सत्याग्रही तुरुगांत होते. स्वतः स्वामीजी कैदेत होते. तेव्हा लायक अली यांच्या नेतृत्वाखाली रझाकारांचे जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले त्यात जुन्या काँग्रेसचे जी. रामाचार हे मंत्री म्हणून गेले. हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा अर्थातच निजामाचा पंचमस्तंभी मतकक्ष म्हणूनच होते. मुसलमानांत निजामाचा मतकक्ष होता हे तर सांगायला नकोच. असाच एक मतकक्ष त्याने व-हाडमध्येही तयार केला होता. वऱ्हाडात निजामाचा भाट होता तो असे म्हणत होता की, विदर्भाचे अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती हे जे चार जिल्हे आहेत ते अठराशे त्रेपन्न सालापर्यंत निजामाच्या राज्याचे भाग होते. मूळचे रघुजी भोसल्यांचे हे राज्य. हे जेव्हा खालसा करण्यात आले तेव्हा त्यातले आठ जिल्हे निजामाला देण्यात आले. उरलेला भाग मध्यप्रदेशाला जोडला. निजामाच्या ताब्यात हे जिल्हे अठराशेतीनला आले. या आठातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला हे चार जिल्हे अठराशे त्रेपन्न साली फौजेचा खर्च म्हणून इंग्रजांनी कापून घेतले. या चारही जिल्ह्यांत निजामाचा मतकक्ष होता. ते म्हणत होते की आम्ही मूळचे निजामांचे आहोत. तेव्हा इंग्रजांनी जाण्यापूर्वी आम्हाला निजामाच्या हवाली करून जावे. हे म्हणणारांतील काही माणसे आता मृत आहेत. काही अजून हयात आहेत. या आघाडीचे जे नेते होते त्यांत प्रसिद्ध हिंदुत्ववादी खापर्डेसुद्धा होते. हे प्रसिद्ध हिंदुत्ववादी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / १७७