पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असणारा हा माणूस. इंग्रजांच्या समोर कोणताही औपचारिक वेश न करता मळकट पायजमे घालून फिरणे आणि कोणताही शिष्टाचार न पाळणे ही केवळ त्याची वैशिष्ट्ये होती. के.एम.पणिक्करांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ते वाचल्यास निजामाच्या शिष्टाचाराच्या अभावाची एक गोष्ट कळून येईल. निजामाने एकदा इच्छा व्यक्त केली : प्रांतांची पुनर्रचना करणाऱ्या समितीच्या (States Reorganization Committee) सर्व सदस्यांनी एकदा चहाला यावे. पणिक्कर म्हणाले, आमंत्रण द्या, येऊ. चहा प्यायला काहीच हरकत नाही. तेव्हा निजामाच्या वैयक्तिक सचिवाने सांगितले की, गेल्या दीड पावणे दोनशे वर्षांत निजामाकडून कुणालाही आमंत्रण गेलेले नाही. प्रथाच तशी नाही. आम्ही अनौपचारिक रीतीने तुमच्या कानावर घालणार की तुम्हाला चहाला बोलावण्याची आमची इच्छा आहे. मग तुम्ही औपचारिकपणे अर्ज करावयाचा की हुजुरांच्या पायाशी पाच मिनिटे बसण्याची तुमची इच्छा आहे. तुम्हाला परवानगी मिळावी, असा तुमचा विनंती अर्ज आल्यावरच हुजुरांची तुम्हाला मान्यता मिळते, असा हा निजाम. पणिक्करांनी लिहिले आहे की ते सहा दिवस हैदराबादला राहिले, पण त्यांची व निजामाची भेट होऊ शकली नाही.

 एवंगुणविशिष्ट हा जो निजाम, त्याच्या डोक्यात सतत एकच कल्पना असते की, हैदराबाद स्वतंत्र व्हायला पाहिजे. सगळी पावले या दिशेने टाकली जातात. त्या दृष्टीने स्वतःची रेल्वे, स्वतःचे पोस्ट खाते, स्वतःची बँक, स्वतःचे नाणे, त्या नाण्याला आंतरराष्ट्रीय मान्यता, स्वतःचे पोलिस खाते, स्वतःचे सनदी नोकर अशी सगळी व्यवस्था आणि साऱ्या जगभर स्वतःला पाठिंबा देणारा मतकक्ष, या गोष्टी तो क्रमाने सातत्याने करीत आला आहे. आणि हे करीत असतानाच त्याने एकोणीसशे पंचवीस साली - की जेव्हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा काही प्रश्न नव्हता - त्याने व्हाइसरॉयला कळविले आहे की, ब्रिटिश सरकारशी झालेल्या त्याच्या सर्व करारांचे अक्षर न् अक्षर पालन करण्याची त्याची तयारी आहे. पण या सर्व करारांचा अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात असे आले आहे की, हे करार दोन समपातळीवरील राष्ट्रांनी आपापसात केलेले करार आहेत. ईस्ट इंडिया कंपनी व हैदराबाद यांचे जे करार आहेत त्यामध्ये मांडलिकत्वाचा उल्लेख कोठेही नाही. त्यामुळे हैदराबादचे व्हाइसरॉयशी असणारं संबंध हे कनिष्ठांच्या वरिष्ठांशी असणाऱ्या संबंधासारखे नाहीत. हिज मॅजेस्टी, किंग ऑफ इंग्लंड अॅण्ड एंपरर ऑफ इंडिया आणि हिज एक्झाल्टेड हायनेस निजाम यांमध्ये जे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७४