पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक राजकन्याही त्याने आपल्या घरी आणली. तुर्कस्थानच्या निरनिराळ्या उद्योगांत दहा कोटी रुपये गुंतविले. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फ्रान्स या सर्व देशांत त्याने मोठाल्या रकमा गुंतविल्या. त्यामुळे ज्या कोण्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी अरेबिया, तुर्कस्थान, इराण आणि त्यांच्याबरोबर शेजारची दहाबारा मुस्लिम राष्ट्र, फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल व त्यांच्याबरोबर युरोपातील काही राष्ट्र, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका एवढा प्रचंड आंतरराष्ट्रीय पाठिंबा आपणास मिळेल याची निजामाने सोय केली. हैदराबादच्या स्वातंत्र्याचा प्रश्न युनोमध्ये जाऊन त्याची चर्चा घडण्याचा संभव आहे हे ओळखून सत्तेचाळीस सालच्या आधीच पंधरावीस वर्षे * कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतःसाठी पाठिंब्याची शाश्वती तयार करणारा निजाम हा माणूस चिक्कू नव्हे हे आपण लक्षात घ्या. कोट्यवधी रुपयाचा खर्च करूनच एवढा मतकक्ष (Lobby) मिळविता येतो.

 अजूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी आपणास सांगतो. युनोमधे प्रश्न । गेल्यावर नकारघंटा (Veto) वाजविण्याचा अधिकार असणारी जी राष्ट्रे आहेत त्यांतील कुणीही आपल्याविरुद्ध मत देता कामा नये याची काळजी-निजाम घेत होता. अमेरिका, चीन, इंग्लंड, फ्रान्स हे जर हैदराबादच्या बाजूला असले तर रशिया विरोधी मत देण्याची शक्यता होती. तसे मत रशियाने देऊ नये यासाठी निजामाने भारतीय कम्युनिस्ट. लोकांशी वाटाघाटी करून, हैदराबाद हे भारतात विलीन न होता स्वतंत्र राष्ट्र राहावे या भूमिकेला अखिल भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आणि हैदराबद कम्युनिस्ट पार्टीचा पाठिंबा मिळविला. या पाठिंब्याच्या जोरावर निजामाने तीस दशलक्ष पौंड किमतीच्या शस्त्रास्त्रांची मागणी रशिया आणि झेकोस्लोवाकिया या देशांत नोंदविली. म्हणजे निजामाच्या जागतिक दूरदर्शीपणाला काही कमी पडलेले आहे असे मुळीच मानता कामा नये. ज्या आपल्या शत्रूचा निकाल आता लागलेला आहे तो शत्रू सामान्य माणूस होता असे मानू नका. बुरसटलेले मध्ययुगीन विचार असलेला, रोज़ चुरगाळलेले पायजमे घालून हिंडणारा, चिक्कू, बावळट माणूस हे जे निजामाचे चित्र आहे ते मुळीच बरोबर नाही. युरोपियन मुत्सद्दयांच्या मंडळात बरोबरीच्या नात्याने बोलण्याची पात्रता असणारी माणसे पदरी बाळगणारा हा माणूस. त्यांना धाकात ठेवण्याची पात्रता


  • नव्हे जवळ जवळ ३० वर्षे. यासंबंधी भरपूर तपशील - मजेदार - उपलब्ध आहे.

- संपादक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७३