पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केल्यावर लोक प्रक्षुब्ध झाले आणि त्यांना आवरायला कोणीच नसल्याने त्यांच्या हातून जी हिंसा घडली असेल तिची जबाबदारी ब्रिटिशांवर आहे व त्या हिंसेला आपण जबाबदार नाही असे गांधींचे म्हणणे आहे. या उलट स्वामीजींचे म्हणणे आहे की, हिंसा त्यांच्या आज्ञेने झाली. आमच्या कृतिसमितीचे म्हणणे आहे की, झालेल्या सर्व हिंसेचे दायित्व आम्ही आमच्या डोक्यावर घेतो; कारण आम्ही सशस्त्र आंदोलन करीत असल्याने आमच्या आज्ञेने ती हिंसा झालेली आहे.

 हैदराबादच्या आंदोलनाची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही यासाठी लक्षात ठेवायला पाहिजेत की, हा प्रश्न हिंसा-अहिंसेचा नव्हता. भारताची प्रादेशिक अखंडता शिल्लक राहते की नाही असा हा प्रश्न होता. जी उग्रता प्रश्नाची होती तीच आंदोलनाची होती. कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, अखिल भारतीय नेत्यापेक्षा आमचे नेते योग्यतेने मोठे होते असे मला सुचवायचे नाही. आमचे सगळेच नेते अखिल भारतीय नेत्यांचेच अनुयायी होते. मी एवढेच सांगत आहे की, आमचे नेते भारतीय नेत्यांचे अनुयायी असल्याने का होईना, वातावरणाची अनुकूलता असल्याने का होईना, भोवताली भारतातून आम्हाला सारखे उत्तेजन मिळत होते म्हणून का असेना, कारणे कोणतीही असोत स्वातंत्र्याचा सगळ्यात उग्रतम असा लढा हैदराबादला झालेला आहे. तुलना होत आहे ती लढ्याची; नेत्यांची नव्हे.

 या आंदोलनाबाबत दुसऱ्या काही लोकांच्या डोक्यात असणारा गैरसमज आपल्याही डोक्यात असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा. हा गैरसमज असा की, हैदराबादचा प्रश्न सरदार पटेल यांच्यामुळे सुटला. सरदार पटेल हे भारताचे फार मोठे नेते होते असेच माझे मत आहे. ते चिल्लर नेते होते असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. कोणतीही घटना ठराविक वेळेला ठराविक पद्धतीने अमलात आणण्याचे फार मोठे सामर्थ्य सरदार पटेलांकडे होते. माणसाचा विश्वास कमावण्याचे सामर्थ्यही त्यांच्यापाशी होते. वेळ येईपर्यंत वाट पाहून वेळ येताच आघात करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यापाशी होते. सरदारांचे ऋण कोणीही नाकारीत नाही. पण हैदराबादच्या प्रश्नाशी सरदार पटेल यांचा संबंध विशेष नाही. जो काही थोडा बहुत आला तो स्वतंत्र भारतात पटेल गृहखात्याचे मंत्री होते म्हणून आला. एकोणीसशे सदतीस साली अखिल भारतीय काँग्रेसच्या कृतिसमितीने (Working Committee) ठरविले की, संस्थानांच्या प्रश्नात आता गंभीरपणे लक्ष घालायला पाहिजे. त्याच वेळी असेही ठरले की बिहार, ओरिसा,

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६४