पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आसाम या भागातील संस्थानांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राजेंद्र प्रसादांनी घ्यावी. बंगालमधील संस्थानांना कोणी मार्गदर्शन करू नये. त्यांचे होईल ते होईल. पण बाबू सुभाषचंद्र बोस यांनी संस्थानांच्या राजकारणात पडू नये; कारण ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. गुजराथ, राजस्थान, सिंध, जुना मुंबई प्रांत या भागातील संस्थानांना मार्गदर्शन सरदार पटेलांनी करावे. काश्मीर हा नेहरूंचा खास विभाग समजून त्यात दुसऱ्या कोणी लक्ष घालू नये. त्यांना वाटले तर नेहरू महात्मा गांधींचा सल्ला घेतील. सल्ला घ्यायचा का नाही हीही गोष्ट नेहरूंच्या इच्छेवरच सोडावी. दक्षिणेतील संस्थानांच्या लढ्यांचे मार्गदर्शन चक्रवर्ती राजगोपालाचारींनी करावे. महात्मा गांधी व मौलाना आझाद यांनी कोणत्याही संस्थानच्या लढ्याचे मार्गदर्शन करू नये. मुळात हैदराबाद संस्थानच्या लढ्याचे मार्गदर्शन मौलाना आझाद यांनी करावे असेच सदतीस साली ठरलेले होते. याला आता लेखी पुरावा नाही. पण ते ठरलेले होते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण हैदराबाद संस्थानच्या प्रजा परिषदेच्या कार्यकारिणीचे जे कायमचे निमंत्रित होते त्यांत मौलाना आझाद एक होते. परंतु आझादांनी हैदराबादकडे लक्ष देण्याचे नाकारले. त्यांनी कारण दिले की, हैदराबादच्या मुसलमानांचा त्यांच्यावर विश्वास नाही. शिवाय ते स्वतः मुसलमान असल्याने ते जे मार्गदर्शन करतील त्यावर विश्वास ठेवणे हैदराबादमधील हिंदूंना कठीण जाईल. दरवेळी त्यांची तक्रार येईल की मी निजामाचे संस्थान वाचविण्यासाठी अधिक नरम भूमिका घेत आहेत. त्यावर त्यांना विचारले की ते मार्गदर्शन करणार नसतील तर ते कुणी करावे? त्या वेळी हा प्रश्न स्वतः महात्मा गांधींनी हाताळावा असा सल्ला आझादांनी दिला व शेवटी महात्मा गांधींनी ते मान्य केले. हैदराबाद आंदोलनाचे मार्गदर्शन एकोणीसशे सदतीस ते पंचेचाळीस स्वतः महात्मा गांधींनी केले आहे. या संदर्भातील हैदराबादशी झालेला सर्व पत्रव्यवहार गांधींचा आहे. पंचेचाळीसपासून संस्थान खालसा होईपर्यंत म्हणजे थेट शेवटपर्यंत मार्गदर्शन नेहरूंचे आहे. पुढील सर्व राजकारणाशी नेहरूंचा संबंध राहिला ही गोष्ट स्वामीजींनी एकोणीसशे बावन्नच्या मराठवाड्याच्या दिवाळी अंकात लिहिलेली आहे. स्वामीजी म्हणतात की त्यांना सरदारांच्याबद्दल अतीव आदर असला तरी ते नेहरूंचे माणूस राहिले. एक तर ते नेहरूंच्या हाताखाली काम करीत होते आणि दुसरे नेहरूंचा ध्येयवाद त्यांना आवडत होता.

 सरदार संस्थानी खात्याचे मंत्री नसते तर त्यांचा संबंध हैदराबादशी आला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६५