पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लढला गेला तेवढ्या उग्र स्वरूपात तो इतरत्र कुठेही लढला गेला नाही हे कुणी तरी लक्षात घ्यावे यासाठी मी वीस हजार हा आकडा पुन्हा पुन्हा लिहिला आहे."

 मी विचारले, “हे तुम्हीच का नाही लिहिले?"

 ते म्हणाले, "मीच या आंदोलनात नेता होतो. मी संन्यासी, संन्याशाने हे लिहिले तर त्यात त्याची अहंता दिसते."

 असो. हा मुद्दा आता आपणासमोर स्पष्ट झाला असेल. आणखीही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. ती गोष्ट अशी, भारतामध्ये जे सशस्त्र आंदोलनाचे प्रयत्न झाले त्यातला सर्वव्यापी व सर्वांत मोठा असा प्रयत्न बेचाळीस सालचे आंदोलन हा होय. या आंदोलनासंबंधी त्या वेळच्या इंग्रजी सरकारचे म्हणणे असे की त्यात नेते, अनुयायी आणि चिल्लर म्हणून एकूण दहा हजार लोक समाविष्ट झाले होते. काँग्रेसचे म्हणणे असे की या आंदोलनात सुमारे चाळीस हजार लोकांनी सहभाग घेतला. ठीक आहे. आपण चाळीस हजार हीच संख्या मान्य करू. याच वेळी बाजूला सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचाही संघर्ष चालू होता. या सेनेत बारा हजार लोकांचा सहभाग होता. शिवाय आठ-दहा हजार लोक सहानुभूती असणारे होते. हे सर्व गृहीत धरले तर सशस्त्र आंदोलनात सहभाग घेणाऱ्या भारतीयांची एका वेळची सर्वांत मोठी संख्या चाळीस हजार व एकूण संख्या साठ हजार येते. या आंदोलनाच्या तीव्रतेनुसार हैदराबाद संस्थानात एका वेळी दीड हजार अथवा एकूणं अडीच हजार सशस्त्र लोकांनी सहभाग घेतला असता तर त्या आंदोलनाची उत्कटता आणि तीव्रता भारतीय पातळीपर्यंत गेली असती. प्रत्यक्षात हैदराबादच्या सशस्त्र आंदोलनात भाग घेणारांची संख्या एकवीस हजार होती. सत्याग्रह करणाऱ्यांतील बहुतेक सशस्त्र आंदोलनात सहभागी होते.* सशस्त्र आंदोलनाची अधिकृत जबाबदारी स्टेट काँग्रेसने स्वीकारली. अखिल भारतीय काँग्रेसच्या इतिहासात आंदोलनाची जबाबदारी काँग्रेसने स्वीकारली अथवा आंदोलनाला मार्गदर्शन काँग्रेसने केले असे एकमेव आंदोलन हैदराबादचे आहे. उरलेल्या सगळ्या ठिकाणी काँग्रेसमध्ये असणाऱ्या मंडळींनीच आंदोलन केले असले तरी काँग्रेसने त्या आंदोलनाची जबाबदारी नाकारलेली आहे. बेचाळीसचे आंदोलन आपण केले असे अखिल भारतीय काँग्रेसचे म्हणणे नाही. सरकारने नेत्यांना अटक


  • कै. कुरुंदकरांचे या ठिकाणचे निवेदन मागे-पुढे झालेले आहे. प्रत्यक्षात सशस्त्र लढा नंतर झाला.
    हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६३