पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हता. कारण यावर बोलावयाचे नाही अशी कुठे तरी सूचना होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या मुद्द्याची फारशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे आता तुम्ही प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हैदराबादचा लढा हा केवळ संस्थानच्या विलीनीकरणाचा लढा नाही तर तो भारताच्या प्रादेशिक सलगतेचा आणि भारताच्या भारत म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा या नात्याने आपण आता या लढ्याकडे पाहता कामा नये. भारताच्या कोणत्याही भूभागावर जेवढ्या उग्र स्वरूपामध्ये स्वातंत्र्याचे आंदोलन झाले तेवढ्या उग्र रूपात हैदराबादमध्ये झाले हे आपण विसरता कामा नये. कारण हा मुद्दा अतिशय आग्रहाने मांडावा अशी स्वामी रामानंद तीर्थांचीच इच्छा होती. आपण तो कसा मांडावा हे त्यांना कळत नव्हते. पण स्वामीजींचे आत्मवृत्त आपण वाचाल तर त्या आत्मवृत्तामध्ये तीनचार ठिकाणी असा उल्लेख आहे की, वीस हजार सत्याग्रही तुरुंगात होते. खरे तर स्वामीजींच्या आत्मवृत्तात या भाकडांना काहीही महत्त्व नाही तरीही वीस हजार सत्याग्रही तुरुंगात होते याचा उल्लेख त्यांनी पुन्हा पुन्हा केला आहे. मी स्वामीजींना विचारले की, हा आकडा पुन्हा पुन्हा लिहिण्यास पुनरुक्ती झाली असे आपणास वाटत नाही काय? किती हजार याची आवश्यकता तुमच्या आत्मवृत्तात का? तुमच्या ग्रंथात माहितीचा तपशील फारसा नाही. आकडेवारीत बोलण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध नाही. मी असे प्रश्न विचारावे आणि स्वामीजींनी ते सहन करावे असेच आमचे गाढ आत्मीयतेचे संबंध होते. माझ्या प्रश्नावर स्वामीजी म्हणाले, “खरा मुद्दा पुनरुक्तीचा नाही. महात्मा गांधीनी या देशात चैतन्याची एक लाट निर्माण केली. ही लाट या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरल्यावर आणि गांधींच्या पाठीशी अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे वीस एवढे दीर्घ स्वातंत्र्य आंदोलन असतानाही आणि ते स्वतः अलौकिक कर्तृत्वाचे असतानाही भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एकोणीसशे तीस साली जे जास्तीत जास्त सत्याग्रही तुरुंगात गेले त्यांची संख्या दीड लक्ष आहे. चाळीस कोटी लोकसंख्येला दीड लक्ष हे प्रमाण घेतले तर चार कोटीला पंधरा हजार येतात. आमचे संस्थान एक कोटी साठ लक्ष वस्तीचे. आम्ही सहा हजार सत्याग्रही पाठविले असते तरीही आमच्या आंदोलनाची तीव्रता गांधीनी भारतभर केलेल्या आंदोलनाच्या बरोबर राहिली असती. या सहा हजारांची तिप्पट अठरा हजार होते. याहीपेक्षा आमचे सत्याग्रही दोन हजारांनी जास्त होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा जेवढ्या उग्र स्वरूपात हैदराबादला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६२