पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला आणि एकवीस लाख रुपये लुटले गेले, तेव्हा त्या हल्ला करणारांमध्ये आपण हातात शस्त्र घेऊन सामील होतो? दुसरे खूप म्हणतील अनंतराव हजर होते. अनंतराव म्हणतील, ती त्या सांगणाऱ्यांची माहिती आहे, मला स्वतःला काही माहीत नाही. अनंतरावांनी कसे सांगायचे की होय, मी हजर होतो. मी अनंतरावांचेच नाव एवढ्यासाठी घेतले की, ज्या शाळेत व्याख्याने चालू आहेत तिच्याशी त्यांचा एकेकाळी संबंध होता. या संस्थेची स्थापनाच त्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या संदर्भात झाली. मी अमूक पूल उडविण्याचा प्रयत्न केला, अमूक ठिकाणची रेल्वे उखडण्यात मी होतो; अमूक ठिकाणी मी अमक्याला गोळी घातली हे सांगायचे कसे? जोपर्यंत लढ्याला स्वातंत्र्य-आंदोलन म्हणून मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे सांगता येत नाही. सांगितले तर तो गुन्ह्याचा कबुलीजबाब होतो. ही मान्यता मिळायला स्वातंत्र्यात पंचवीस वर्षे जावी लागली. त्यामुळे अडचण अशी की ज्या काळात स्मृती ताज्या होत्या तेव्हा सांगण्याबोलण्याची संधीच नव्हती. आता सर्व सांगावयाची संधी आली तर सर्व स्मृती धूसर झालेल्या आहेत. इतक्या की त्यांतल्या पुष्कळ बाबी विसरून गेल्या आहेत.

 या संदर्भात सरदार पटेल यांनी जी नोंद केली आहे ती मी आपल्याला सांगतो. सरदार पटेलांनी गृहखात्याला अशी सूचना दिली आहे की, सशस्त्र आंदोलन आम्ही कसे केले याविषयी सत्ताधारी पक्षाने बोलू नये. असे बोलणे देशात पुढे लोकशाही रुजविण्यासाठी हानिकारक आहे. यामुळे आम्ही आंदोलन कसे केले याविषयीचा वेगवेगळ्या पातळ्यांवरचा सर्व संवाद वेगवेगळ्या पद्धतीने बंद पाडला पाहिजे. एकदा तुम्ही स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही लोकशाही मार्गाने राज्य चालवायला लागता. त्यानंतर काल आम्ही बंदुका कशा हाताळल्या हे सांगणे हा धमकी देण्याचाच प्रकार होता. 'बंधूंनो, मी आठ माणसांना गोळ्या घालून ठार मारलेले आहे, मी महापुरुष आहे; मला मत द्या,' हे सांगणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. हिंसक क्रांतीचे गोडवे गाणारी भाषा बंद झालीच पाहिजे; अशा आशयाची नोंद वल्लभभाईंनी केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवरील या गोष्टीची चर्चा, बोलणे, लिहिणे यात मोडता घालण्यात आला. लीग ऑफ सोशियालिस्टस्चे जे कार्यकर्ते होते ते सर्व बावन्न सालच्या निवडणुकीला उभे होते. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात आंदोलनातील स्वतःच्या हकीगती सांगितल्या नाहीत. ते सोशिअॅलिझम्, कम्युनिझम याच गोष्टी बोलत राहिले. कुणी गफलतीने कुठे काही संदर्भ दिले पण या देणाऱ्यांतील एकही प्रथम श्रेणीचा नेता

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६१