पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उत्साहाने साजरा झाला. मोठी सभा झाली व ह्या गोष्टीची सरकारने एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये दखल घेऊन वामन नाईकांना तंबी द्यावी असा ठराव केला होता.

 दुसरी घटना म्हणजे त्याच वेळेला आरंभ झालेल्या खिलापत चळवळीला हैदराबादेत व्यापक पाठिंबा मिळाला होता. सभा तर अनेक झाल्या, पत्रके निघाली. इंग्रज सरकारने मध्ये पडून निझामाने काहीतरी करावे असे सुचवावे लागले, इतपत तिचा ताण व दाब जाणवला.

 तिसरी घटना म्हणजे ५ व ६ सप्टेंबर १९३० ला प्रजाशिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. त्या सभेचा वृत्तान्त मुद्दाम डोळ्याखालून घालण्याजोगा आहे. त्या वेळी सभासंमेलनांवर कडक निर्बंध असताना ही परिषद घेतली होती व तरीही ह्या सर्व मंडळींनी सरकारी धोरणाला विरोध केलाच. त्या सभेत पं. केशवराव कोरटकर म्हणाले होते की, “ह्या परिषदेच्या मते शिक्षणप्रगतीत किंवा सभा भरविण्यात कसलेही अडथळे आणले जाऊ नयेत. असे असून नं ५३ च्या ज्या सरकारी हुकमाने अशा सभा भरविण्यास बंदी घालण्यात आली तो हुकूम परिषदेला असंमत आहे. म्हणून तो सरकारने मागे घ्यावा. या हुकमाने सार्वजनिक काम करणाऱ्यांची पंचाईत, कुचंबणा होत आहे. बरे सार्वजनिक सभेची व्याख्याही कोठे केली नाही. आमच्या येथे एका इसमाचीही सार्वजनिक सभा होऊ शकते. मला वाटते सर्व जगात अशा तऱ्हेचा चमत्कारिक हुकूम कोणत्याही सरकारने काढला नसेल." हे त्या वेळचे प्रातिनिधिक मत होते व सकृद्दर्शनी बंधने पाळूनही माणसांचा प्रक्षोभ निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पातळीवर संघटित होत होता. १९३८ ला त्याचा स्फोट झालेला दिसला. कारण त्याला मिळालेला अ.भा. काँग्रेसचा आशीर्वाद. पण जोपर्यंत अंतर्गत कार्याचा प्रश्न होता तेव्हा येथे ही झुंज चालूच होती. १९२० ते ३८ ह्या कालावधीत हैदराबादेत व जिल्ह्यातून जनजागृतीच्या दृष्टीने सभासंमेलनांची संख्या तर आमच्या अंदाजाप्रमाणे ५० तरी असेल. त्यात काही सभासंमेलने उघडपणे राजकीय म्हणून घेतलेली आहेत. तर आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक नावाने घेतलेल्या अशा मोठ्या सभा आहेत. त्या होण्यापूर्वी वाद झालेले आहेत व झाल्यावर चर्चा झालेल्या आहेत. त्यातून नव्या संघटना निर्माण होत गेल्या, काही मोडून गेल्या, काही पुन्हा निर्माण होत गेल्या. हे मोठ्या सभांचे, परिषदांचे झाले. मग लहानमोठ्या स्थानिक तर दर आठवड्याला होत गेल्याची नोंद उपलब्ध आहे. महापुरुषांच्या जन्ममृत्यूने हे खाद्य हैदराबादकरांना सतत पुरविले. सर्वांचा उद्देश एकच म्हणजे एक आपल्या समाजाची जागृती व उन्नती व त्यासाठी चळवळ. 'आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देवनमस्कारम्