पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 केशवं प्रतिगच्छति' या न्यायाने हेही मुक्तिआंदोलनाचेच अंग होते. हे अंग बलवान होते म्हणून लढ्याची हाक काळाने देताच तोही समाज निमिषार्धात उभा राहिला. या सगळ्या प्रयत्नांचा जाणीवपूर्वक आरंभ १९२० मध्ये झालेला आम्हाला दिसतो. म्हणून आम्ही हैदराबादच्या संग्रामाचा आरंभबिंदू १९२० मानतो.

 १९३८ ला लढा उभा राहिला व तोही लवकरच संपला. कारणे सुविदित आहेतच. मग त्यानंतर येतात वाटाघाटी. त्याही नेटाने घडल्या. १९३९ ते १९४६ पर्यंत. इतिहास म्हणून त्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती ही अभ्यासविषय झाली पाहिजे. आमच्या दृष्टीने ती झाली आहे. कुरुंदकरांशी मतभेद म्हणून नव्हे पण त्यांचे गमतीदार उदाहरण म्हणून जाता जाता एका व्यक्तीचा निर्देश करावासा वाटतो. कुरुंदकरांनी 'एजंट जनरल' या लेखात जी. रामाचार यांचा खोचक उल्लेख केला आहे. मुन्शी यांचा उपहास करताना त्यांनी रामाचार यांची "कुठला कोण सोम्या गोम्या" अशा भावनेने त्यांची संभावना केली आहे. रामाचार हे पात्र जुने आहे. १९३७ च्या सुमारास इत्तेहादुल मुसलमीनच्या बहादूर यार जंगाचे दडपण एकीकडे तर तत्पूर्वी वामन नाईक (मृ.१९३६) व अन्य चळवळींच्या सतत दडपणामुळे दुसरीकडे, तर १९३५ चा कायदा पास झाल्यानंतर फेडरेशनच्या योजनेत हैदरावाद सामील व्हावे म्हणून भारत सरकारचे दडपण तिसरीकडे अशा चौफेर दडपणातून पळवाट शोधण्यासाटी निझामाने अक्कलहुशारीने एक वाट शोधून काढली होती. ती म्हणजे अय्यंगार कमिटीची स्थापना. या कमिटीतून निष्पन्न काहीच झाले नाही, व्हायचेच नव्हते. पण त्या कमिटीच्या व हैदराबादच्या राजकीय सुधारणाविषयक ऊहापोह गृहीत होता. अपेक्षेप्रमाणे कमिटीचे काम फसल्यानंतर इत्तेहादुल मुसलमीन व काँग्रेस यांच्यात राजकीय सुधारणांच्या संदर्भात बऱ्याच वाटाघाटींच्या फेऱ्या झाल्या. बहादूर यार जंग यांच्यानंतर इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेचे अध्यक्ष होते. मौ.अबुल हसन सय्यद अली. ते सौम्य प्रकृतीचे गृहस्थ होते. ह्यांनी संस्थानातील मुस्लिम राजकारणाला निराळे वळण देण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या प्रयत्नांना सर सालार जंग (तृतीय) यांचा मनापासून पाठिंबा होता. यातून थोडेफार राजकीय नवनीत उत्पन्न झाले होते व बऱ्याच मुद्द्यांवर काँग्रेस व इत्तेहादुल मुसलमीन यांच्यात समझोता झाला होता. तो निझामाने १९४१ च्या सुमारास स्वतः उधळून लावला. ह्या वेळी काँग्रेसच्या वतीने काशिनाथराव वैद्य, नरसिंगराव व रामाचार ह्या तिघांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. हा करार अमलात आला असता तर पुढचे रामायण वेगळे झाले असते. ते असो, पण अय्यंगार कमिटीच्या आधीपासून ते या वाटाघाटींच्या वेगवेगळ्या फेरीत जो रामाचार