पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत, पदर आहेत. त्यांच्या संपूर्ण आकलनातूनच हैदराबादच्या इतिहासाचे वेगळेपण प्रगट होणार आहे. किंबहुना या इतिहासाचे पहिले वैशिष्ट्यच असे की हे भिन्न भिन्न घटक परस्परांवर सतत परिणाम घडवीत असताना दिसतात. लोकजीवन, समाज हा एक घटक, संस्था, व्यक्ती, कार्यकर्ते हा दुसरा घटक. हैदराबाद राज्यातील मुस्लिम समाज, त्याच्या चळवळी, नेतृत्व हा तिसरा घटक. निझाम व निझामची परंपरा चौथा घटक. दिल्ली, लंडन येथून सूत्रचालन करणारे इंग्लंडचे साम्राज्य व भारत सरकार हा पाचवा घटक. सबंध भारतातील जागृत भारतीय हिंदू समाज हा सहावा घटक. भारतातील व अंशतः भारताबाहेरील मुस्लिम समाज व सत्ता हा सातवा घटक. भारतात कार्यशील असणारी प्रामुख्याने काँग्रेस संघटना, तिचे ध्येयधोरण, नेते, कार्यकर्ते हा आठवा घटक. असे हे आठ घटक, हे हैदराबादच्या इतिहासात एकत्र आलेले आहेत. सबंध भारताचे संतुलन साधणारा भवितव्य घडविणारा कटिप्रदेशी स्थिरावलेला हा हैदराबाद प्रांत, हा भारताच्या विसाव्या शतकाच्या इतिहासाचा महत्त्वाचा पदर आहे. हैदराबादच्या होकार-नकारावर भारताचे भवितव्य दोलायमान झालेले काही क्षण इतिहासाने स्वातंत्र्याच्या उदयकाळी पाहिले आहेत. त्यातील यातना सोसल्या आहेत; आनंद अनुभवला आहे. एवढे अनन्यत्व या इतिहासाला मिळाले त्याचे महत्त्वाचे विवेचन ह्या ग्रंथात आहे. कुरुंदकरांनी कळत नकळत उत्तरकालीन घटनांची मीमांसा केली. आमच्यासमोर मात्र केवळ तेवढाच व तोच पट नाही. कुरुंदकरांचे विवेचन स्वीकारूनही त्यांनी स्वीकारलेली चौकट त्यांना अभिप्रेत आहे. त्या चौकटीपेक्षा आणखी मोठी व संमिश्र आहे, अशी आमची भूमिका आहे. कुरुंदकरांनी १९३८ नंतरच्या घटना विचारात घेतल्या.

 योगायोग असेल पण १९२० पासूनच प्रथम निझामाने एक्झिक्युटिव्ह कौन्सिल स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे १९२० पासून हैदराबादेतील कार्यकर्त्यांनी सातत्याने जनजागृतीचे राजकीय कार्य सुरू केले. अ.भा. काँग्रेसच्या अधिपत्याखाली वेळोवेळी स्टेट परिषदेच्या सभा तर भरतच पण शिक्षण, साहित्य, ग्रंथालये, सामाजिक सुधारणा या विषयांच्या संदर्भात कुठेही कोणतीही संधी मिळाली की ही मंडळी सभा, संमेलने भरवीत, व्याख्याने देत, छोट्यामोठ्या पुस्तिका काढीत, ठराव पास करीत, गावोगाव हिंडत व प्रत्यक्ष सरकारशी हेतुपूर्वक संघर्ष टाळून जनतेत जागृतीचे कार्य धडाडीने व निष्ठेने करीत. याची अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. तीन उदाहरण देतो.

 २ ऑक्टोबर १९२१ ला महात्माजींचा ५३ वा वाढदिवस हैदराबादेत मोठ्या