पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वस्तुस्थिती आहे. वस्तुतः ह्या विषयावर माहितीचे अगणित भांडार आता उपलब्ध आहे, पण त्याचा उपयोग करण्यासंबंधी कुणाजवळ समग्र योजना नाही. म्हणजे एका बाजूने या विषयाबद्दल अभ्यासकांची अनास्था व दुसऱ्या बाजूने समाजात ह्या विषयाबद्दलचे प्रचंड कुतूहल असे मोठे विरोधाभासाचे चित्र हैदराबादच्या संदर्भात दिसत आहे. हे चित्र पालटावे, जास्तीत जास्त साधने, माहिती पुढे यावी, चर्चा व्हावी व इतिहास विषयाचे एक मौल्यवान दालन प्रकाशाने उजळून निघावे यासाठी आम्ही स्वतः गेली आठ-दहा वर्षे कार्यशील होतो. ते कार्य पूर्ण झाले नसले तरी मोठ्या प्रमाणात मोकळे झाले आहे, होणार आहे. या साधन-सिद्धीच्या प्रयत्नात कुरुंदकरांचा ग्रंथ हा मौल्यवान ठरणार आहे. तो कसा आणि किती याचा थोडा ऊहापोह करणे उपलब्ध स्थलमर्यादेत इष्ट ठरेल.

 आपल्या लेखनात कुरुंदकरांनी १९३८ हा स्वातंत्र्य-संग्रामाचा आरंभबिंदू मानला आहे. ती तारीख आहे २४ ऑक्टोबर १९३८. काँग्रेसने त्या वेळी सत्याग्रहाची तुतारी पू. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली कुंकली. काँग्रेसचा लढा म्हणायचा पण ही हैदराबाद स्टेट काँग्रेस जन्माला येण्यापूर्वीच निझाम सरकारने तिच्यावर जातीय संघटना म्हणून बंदी घातली होती. त्यापूर्वीच १९३७ ला कुप्रसिद्ध गश्तीक्रमांक ५३ काढून निझाम सरकारने हैदराबाद राज्यात कुठेही परवानगीशिवाय सभा, संमेलन, मेळावा घ्यायचा नाही हे घोषित केले होते. तरीही लढा आरंभ झालाच काँग्रेसच्या लढ्याच्या आसपासच आर्य समाजानेही आपले आंदोलन सुरू केले होते व हिंदू महासभेनेदेखील आपले आंदोलन स्वा. सावरकरांच्या प्रेरणेने आरंभिले होते. हे लढे दीर्घकाळ चालले नाहीत. नेते, कार्यकर्ते तुरुंगास-गेले. त्यानंतर उपस्थित झाले ते १९३९ चे वंदे मातरम् प्रकरण. ते वर्ष दोन वर्षे सर्वांनाच पुरले. त्यानंतर १९४२ च्या लढ्याच्या वेळी हैदराबाद राज्यात सत्याग्रह झाला. त्यानंतर १९४६ पर्यंत अन्य कुठला लढा वा सत्याग्रह नाही. स्टेट काँग्रेसवरची बंदी उठली ती ३ जुलै १९४६ ला व येथून नवे पर्व सुरू झाले. भारतातही वेगाने घटना घडल्या. या वादळात हैदराबादेतील चळवळ हेतुपूर्वक व सगळ्यांच्या संमतीने सशस्त्र लढ्यात रूपांतरित झाली; व १७ सप्टेंबर १९४८ ला ती सफल झाली. म्हणजे हैदराबादचा लढा म्हणून म्हणायचा तर तो १९३८ ते १९४८ या नऊ वर्षे ११ महिन्यांचा आहे. पण लढा, लढा म्हणून महत्त्वाचा असला, रोमहर्षक असला, वंदनीय असला तरी तो सगळा संपूर्ण इतिहास नाही. हैदराबादचा इतिहास हे एक वेगळेच गुंतागुंतीचे जबरदस्त प्रकरण आहे व या प्रकरणात लढ्याचे योगदान ठसठशीत असले तरी या इतिहासाला वेगवेगळ्या पातळ्या