पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना

 हैदराबादच्या स्वातंत्र्य-संग्रामाच्या संदर्भात कै. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी वेळोवेळी लिहिलेल्या स्फुट लेखांचा व सेलू येथे त्याच विषयावर त्यांनी दिलेल्या भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील तीन व्याख्यानांचा हा संग्रह 'मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश' या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध होत आहे. 'हैदरावाद-विमोचन आणि विसर्जन' असे जरी या पुस्तकाचे नामकरण केले असले तरी त्यात केवळ संग्रामाचा संपूर्ण इतिहास नाही. तसेच संग्रामाव्यतिरिक्त इतर अनुषंगिक घटना व व्यक्ती यांचे निर्देश आहेत व प्रामुख्याने चर्चा आहे. या संग्रामाच्या मीमांसेत अनुस्यूत घटनांचा क्रम आपण किती मागे न्यायचा हा एक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने उपस्थित होतो. तसेच जो काही आरंभ गृहीत धरला जाईल तेथपासून संग्राम संपूर्ण सिद्धीपर्यंतच्या सर्व नसल्या तरी ठळक घटना, प्रमुख प्रवाह, भिन्न गटात, भिन्न स्थळी वावरलेल्या अनेकविध व्यक्ती यांची ओझरती का असेना नोंद असल्याची अपेक्षा अशा लेखनाच्या वेळी स्वाभाविक मानावी लागते. कै. नरहर कुरुंदकरांनी ज्या परिस्थितीत, ज्या संदर्भात हे लेखन केले तो संदर्भ ध्यानी ठेवला तर ही अपेक्षा हा ग्रंथ पूर्ण करणार नाही हे आरंभीच नमूद करायला हवे. कुरुंदकरांना जे अभिप्रेतच नाही ते कार्य त्यांनी केले नाही म्हणून हेत्वारोप होऊन अन्याय होऊ नये म्हणून आम्ही ही बाब आरंभीच नोंदवू इच्छितो. संपूर्ण पुस्तकात हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाच्या संदर्भात विवेचन असल्यामुळे ते नाव पुस्तकाला आम्हांला द्यावेसे वाटले. त्याची जबाबदारी आमची आहे, कुरुंदकरांची नाही. शिवाय संग्रामाचा इतिहास म्हणजे काय, तो कोठून आरंभ करायचा, त्यात कोणता दृष्टिकोण स्वीकारायचा याबाबत अद्याप पुरेशी चर्चा नाही, माहिती नाही, प्रसिद्ध साधने नाहीत. काही चरित्रग्रंथ, आठवणी, संघर्षाच्या सुट्या हकिकती, काही जुजबी मीमांसा जरूर उपलब्ध आहेत. पण ती सामग्री पुरेशी नाही म्हणून म्हणा वा अन्य कारणाने म्हणा, या विषयावर व्यवस्थित अभ्यास नाही ही