हस्तक्षेप केला अशा प्रकारचे वर्णन मुनशी सतत करीत असतात, पोलिस अॅक्शन होऊन गेल्यानंतर मुनशींनी निजामाला जो सल्ला दिला त्यात हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. माझा नाइलाज होता. मी जवळपास रझवीचा कैदी होतो. सारे उद्योग रझवीचे आहेत, असा जप करीत राहावे. निजामाने स्वतःला सोयीस्कर असल्यामुळे पुढे हा जप चालू ठेवला. मुनशींनी निजामाचे हे म्हणणे खरे असल्याचा भास निर्माण केला आहे. सत्य ह्यापेक्षा निराळे आहे. २१ जुलै १९४८ ला मॉक्टन कायमचा निरोप घेऊन परतले. या दिवसापर्यंत निजामाला केव्हाही मॉक्टनद्वारा माऊंट बॅटनला हे कळविता आले असते की, आपणावर गैरवाजवी दडपण आणण्यात येत आहे. आपणाला भारत सरकारचे साहाय्य हवे आहे. आणि भारतीय फौजा खरोखरी निजामाच्या निमंत्रणानुसार, पण दाखविण्यासाठी निजामाच्या इच्छेविरुद्ध आल्या असत्या. त्यांनी रझाकारांचा पाडाव केला असता. नंतर सत्य सर्वांना कळले असते. लायक अली पंतप्रधान झाले त्यावेळी तर भारतीय फौजा अजून राजधानीजवळच होत्या. आणि हैदराबादचे सरसेनापती एल. इद्रुस रझवीचे विरोधक असल्यामुळे केव्हाही हैदराबादच्याच फौजा रझाकारांच्या विरोधी वापरल्या असत्या.
कासीम रझवी हे नेहमीच निजामाच्या हातातील एक प्यादे होते. लायक अली अगर मोईन नवाझ जंग ही माणसे रझवीची अनुयायी नव्हती, ती सूत्रधार होती. हैदराबादच्या राजकारणावरील त्यांची पकड कायम होती. हैदराबादची माणसे सोडा पण कॅम्पबेल जॉन्सनचेही प्रत्यक्ष पाहणीनंतर हेच मत झाले होते.
मुनशींच्या मनात निजामाविषयीच्या प्रेमाचा उदय १६ सप्टेंबरला झालेला दिसतो. १३ सप्टेंबरला भारतीय फौजा अगदी सकाळी हैदराबादमध्ये घुसल्या. तो वेळेपर्यंत मुनशींना निजामाविषयी फक्त तिरस्कार होता. निजामाची अहंता एवढी मोठी की ते मुनशींना राजकीय चर्चेसाठी लायकच समजत नसत. एजंट जनरल म्हणून मुनशी रुजू झाल्यानंतर निजामाने एक औपचारिक भेट त्यांना दिली होती. पण त्याही वेळी राजकीय चर्चा टाळण्यात आली. पुन्हा कधी निजामाने औपचारिक भेट सोडा, पण सार्वजनिक समारंभालाही बोलावले नव्हते. तेव्हा मुनशींना राग असणे स्वाभाविक होते. १३-१४ आणि १५ सप्टेंबरला हैदरावाद नभोवाणी विजयामागून विजयाच्या वार्ता देत होती. हैदराबाद नभोवाणीने प्रथमच १६ सप्टेंबरला दुपारी जनतेला अधिकृतरीत्या सत्य सांगितले. सायंकाळी राजा महबूब करण भेटले. रात्री दीनयार