पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्रोह केला. अजून स्वामीजी तुरुंगात होते. वीस हजार सत्याग्रही तुरुंगात होते. अजून हैदराबादने भारताशी जैसे थे करार केलेला नव्हता. या काळी लायक अली मंत्रिमंडळात हे गृहस्थ मंत्री म्हणून गेले. मंत्री असताही स्वतःला काँग्रेसजन म्हणून घोषित करीत बसले. रामाचारीच्या रूपाने मुनशींना फार मोठा आधार मिळाला. त्यांच्या गौरवार्थ मुनशींनी खूप वाक्ये खर्चिली आहेत.

 मुनशींच्या मते जी.रामाचारी हे स्टेट काँग्रेसच्या संस्थापकांच्यापैकी एक होते. ही एक चुकीची माहिती आहे. स्टेट काँग्रेस ज्यांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आली त्यात अनेक लोक असले तरी हा जमीनदार नव्हता. स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष गोविंदराव नानल व चिटणीस स्वामीजी होते. वैद्य, बिंदू, माडपाठी हनुमंतराव, वामन नाईक, केशवराव कोरटकर यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काँग्रेसच्या स्थापनेशी संबंध होता. तरुण म्हणून त्यात बी. रामकृष्णरावही होते. कारण कोरटकरांनी पुरस्कृत केलेल्या चळवळीत ते असतच. पण रामाचारीप्रमाणे निष्ठाशून्य माणूस राष्ट्रीय चळवळीचे संस्थापक असणे शक्य नव्हते. स्टेट काँग्रेसवर बंदी, हजारो लोक तुरुंगात असताना तू मंत्रिमंडळात कसा, असे रामाचारींना मुनशी विचारणे शक्य नव्हते. वाटाघाटीसाठी पक्षद्रोहाला उत्सुक असणारा हा माणस मुनशींना फार जवळचा वाटला. मुनशींचे रामाचारीशी जितके सख्य जुळले तितके कोणत्याच मवाळाशी जुळणे शक्य नव्हते. रामाचारीचे म्हणणे असे की, त्यांना लायक अलीने नव्या सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रश्न हा आहे की, नव्या सुधारणाचे स्वरूप न पाहता, त्यांचा अधिकृत आरंभ हाण्यापूर्वीच लढ्याशी द्रोह करून तुम्ही मंत्रिमंडळात का गेला? आणि लायक अली मंत्रिमंडळालाही पूर्वेतिहास होता. ह्यापूर्वी हैदराबादचा मुख्यमंत्री कधी इत्तेहादुल मुसलमीनचा नेता नव्हता. लायक अलींना पंतप्रधान करून इत्तेहादुल मुसलमीन हा पक्ष अधिकृत राजकर्ता पक्ष म्हणून निजामाने स्वीकारला होता. रामाचारी पक्षातीत मुसलमानाच्या मंत्रिमंडळात जात नव्हते. कासीम रझवीच्या मंत्रिमंडळात जात होते. तरीही भारत सरकारच्या एजन्ट जनरलला जीवलग माणूस हाच होता.

 मुनशींनी महिनोगणती रामाचारींना हाताशी धरून कधी गनेरीवाल यांच्याद्वारे तर कधी पन्नालाल पित्तींच्याद्वारे तडजोड घडवून आणण्याचा सतत प्रयत्न केला. भारतात संपूर्णपणे बिनशर्त सामील होण्यास जर निजाम तयार झाला तर ते सर्वांनाच हवे होते. पण हे घडण्याची शक्यता नव्हती. इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /११३