पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयारी नव्हती. स्वामीजींनी हैदराबादेत पुन्हा प्रवेश केला, जानेवारी ४८ अखेर त्यांना अटक झाली. इथपासून पोलिस अॅक्शनपर्यंत ते पुन्हा अटकेतच होते. यापूर्वी स्पष्टपणे त्यांनी मुनशींना आपण वाटाघाटीत रस घेणार नाही हे सांगून टाकले. आत्मवृत्ताच्या पृष्ठ १९६ वर त्याची मुद्दाम नोंद आहे. स्वामीजींच्याविषयी मुनशींच्या मनात आकस निर्माण होण्याचे हे कारण आहे. हा आकस वाढतच गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हा आकस शिगेला पोचला कारण स्वामीजी कडवे महाराष्ट्रवादी व मुंबई महाराष्ट्राची आहे या भूमिकेचे पुरस्कर्ते होते. मुनशींनी आपल्या पुस्तकात जितके खुनशीपणाने लिहिता येईल तितके लिहिले आहे. मुनशींनाही फारसे विरोधी काही लिहिता आलेच नाही, इतके उज्ज्वल चरित्र व चारित्र्य स्वामीजींचे होते हा प्रश्न निराळा.

 मुनशींना वाटाघाटीसाठी हस्तक हवे होते. ह्यामुळे लढ्याचा विश्वासघात झाला तर मुनशींना पर्वा नव्हती. भारतीय स्वातंत्र्य मुळातच दुबळे झाले तरी मुनशींना चिंता नव्हती. हे हस्तक मुनशींना मवाळ पक्षात मिळाले. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये आरंभापासूनच एक मवाळ गट होता. पुढे हैदराबादचे मुख्यमंत्री झालेले बी. रामकृष्णराव, विधानसभेचे सभापती झालेले काशीनाथराव वैद्य, आंध्र पितामह माडपाठी हनुमंतराव इत्यादी मंडळी या मवाळ पक्षाची होती. मवाळ पक्षाच्या पुढाऱ्यांना त्यांच्या मनोवृत्तीप्रमाणे वाटाघाटी हव्या होत्या. तडजोड हवी होती. काँग्रेससारख्या पक्षात असा गट असणारच. पण ह्या गटालाही शिस्त असते. बी. रामकृष्णराव हे अशा शिस्तीचे गृहस्थ होते. हेच वैद्य, माडपाठी इत्यादींच्याविषयी म्हणता येईल. त्यांनी स्वामीजींना विरोध केला. त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली. विषय नियामक समितीत लढ्याच्या ठरावाला कसून विरोध केला. पण संघटनेने बहुमताने लढ्याचा ठराव स्वीकारल्यानंतर खुल्या अधिवेशनास पाठिंबा दिला. ते शांतपणे लढा सुरू झाल्यानंतर तुरुंगात गेले. त्यांनी कधी जाहीर रीतीने काँग्रेसशी संबंध तोडला नाही. कधी लढ्याचा निषेध केला नाही. संघटनेच्या आज्ञेविना ते जाहीर रीतीने वाटाघाटीला आले नाहीत. ह्याला शिस्त असे म्हणतात.

 ही माणसे खाजगीत कुरकुरत होती. वाटाघाटी व्हाव्या असे त्यांचे म्हणणे होते. कणी वाटाघाटीला आरंभ केला तर ह्यांची अनुमती होती. पण जोवर स्वामीजी वाटाघाटीला तयार नाहीत तोवर चर्चेला अर्थ नाही हे ते जाणत होते. ते स्वतः वाटाघाटीला तयार नव्हते. पण एक गृहस्थ जी.रामाचारी म्हणून होते त्यांनी लढ्याशी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /११२