पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपर्क ठेवला होता. सर्व चर्चा प्रामुख्याने मेनन आणि मॉक्टन यांच्यातच होई. राजा आणि मंत्रिमंडळ मुनशींना मोजण्यास तयारच नव्हते. पण मुनशींना तर हा प्रश्न वाटाघाटींनी मिटवून श्रेय मिळवायचे होते. हे घडावे कसे?

 पोलिस अॅक्शन झाल्यानंतर वार्ताहारांशी बोलताना स्वामीजी म्हणाले की, हैदराबादेतील जनतेला मुनशींचे वास्तव्य हा फार मोठा आधार होता. उद्याच्या पिढ्या आपला रक्षणकर्ता म्हणून त्यांचे स्मरण करतील. स्वामीजींच्या ह्या मुलाखतीला औपचारिकपणापलीकडे अर्थ नव्हता. मुनशींनी असे सुचविले आहे की, दिल्लीच्या मर्जीतून मी उतरल्यानंतर त्यांचे माझ्याविषयी मत बदलले. मुनशींनी केलेला हा अजून एक विपर्यास. मुनशी आणि स्वामीजी ह्यांचे संबंध आरंभापासूनच बिघडलेले होते. आधीच वैयक्तिक संबंध फारसा नव्हता. स्वामीजींना सरळ आगीत उडी घेणारी माणसे आवडत. त्यांना कायद्याचा कीस काढणे रुचत नसे आणि स्वामी मुत्सद्दी नव्हतेच. प्रामाणिकपणा हा एक छोटासा गुण त्यांच्याजवळ होता. तितक्यावर त्यांचे निभावून गेले.

 मुनशींची नेमणूक जाहीर झाल्यानंतर स्वामीजी आणि मुनशी यांची प्रदीर्घ चर्चा मुंबईत झाली. या पहिल्या चर्चेतच दोघांना हे कळून चुकले की, आपले एकमेकांशी जमणार नाही. खरा विवाद्य मुद्दा वाटाघाटींचा होता. भारत सरकारचे म्हणणे हे की, हैदराबादने भारतात पूर्णपणे सामील झाले पाहिजे. हैदराबादचे म्हणणे हे की, आपण स्वतंत्र व सार्वभौम आहो. असे दोन टोकावर दोघे उभे असूनसुद्धा त्यांच्या वाटाघाटी सतत चालू आहेत. आणि सन्माननीय तडजोडीचे प्रयत्नही नेटाने चालले आहेत. असे जर आहे तर स्टेट काँग्रेस आणि हैदराबाद शासन यांनी वाटाघाटी करून तडजोडीचा प्रयत्न का न करावा? असे मुनशींचे म्हणणे होते. वाटाघाटींनी सुटण्याजोगा हा प्रश्न नव्हे. तडजोड करण्यासाठी आम्ही लढत नाही आहो. हा निर्णायक लढा आहे. त्यात तसूचीही तडजोड शक्य नाही. उलट वाटाघाटींमुळे लढा मंदावतो व संपतो. त्यानंतर भारत सरकारला हा प्रश्न सोडविताच येणार नाही. म्हणून वाटाघाटीचा प्रारंभ तर सोडा पण तशा शक्यतेची सूचना देणे सुद्धा भारताचा व हैद्राबाद जनतेचा द्रोह आहे असे स्वामीजींचे म्हणणे होते.

 पण मुनशींना वाटाघाटी हव्या होत्या. स्टेट काँग्रेस आणि हैदराबादचे शासन यातील वाटाघाटीचे सूत्रचालक मुनशीच राहणार होते. ही संधी सोडण्याची त्यांची

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१११