पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






११.
एजंट जनरल

 कन्हैय्यालाल माणिकलाल मुनशी ही भारतीय राजकारणातील एक चतुरस्त्र, कर्तबगार आणि बुद्धिमान व्यक्ती होती. त्यांना प्राचीन भारताविषयी, भारतीय परंपरांच्याविषयी अतिशय प्रेम व अभिमान होता. संस्कृत आणि संस्कृतीचे ते नुसते चाहतेच नव्हते तर त्या क्षेत्रात जिद्दीने काम करणारे कार्यकर्तेही होते. गुजराथचे श्रेष्ठ साहित्यिक म्हणून जशी त्यांची कीर्ती होती तशीच इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांची प्रसिद्धी होती. भारतीय विद्याभुवन आणि ह्या संस्थेने प्रकाशित केलेला भारताचा विस्तृत चौरस इतिहास ही मुनशी ह्यांनी केलेली भारताची फार मोठी सेवा आहे असे मी मानतो. कुशल कायदेपंडित म्हणून ते देशभर ओळखले जात होते. काँग्रेसच्या उच्च वर्तुळात त्यांच्या गुणाची चाह असणारे नेते होते. काँग्रेसच्या आत आणि बाहेर त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. काँग्रेसकडे असून कडवे हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी असून राजकारणात मवाळ व उजवे असे त्यांचे संमिश्र व्यक्तिमत्त्व होते.

 त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्र भारताची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. तशी मिळणेही शक्य नव्हते. एक तर मुनशींच्या मनाचा एक कप्पा अतिशय क्षुद्र होता. त्यांच्या दर्जाच्या माणसाला शोभणार नाही अशा प्रकारची तुच्छता त्यांना गुजराथखेरीज इतर प्रांतांच्याविषयी वाटे. आणि ही तुच्छता मनात ठेवून ते भारतीय हिंदूंचे नेते बनू पाहात. दुसरे म्हणजे त्यांचा स्वभाव प्रबल महत्त्वाकांक्षी आणि आत्मकेंद्री होता. त्याला मर्यादेचे भान नसे. स्वतःच्या शक्तीबाबतच्या गैरसमजामुळे त्यांना व्यक्तीवर अगर कार्यावर निष्ठा ठेवणे जड जाई. परिणामी इतरांनाही त्यांच्यावर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०३