पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाल्या. व्यवहारतः सोळा ऑगस्ट हा दिवस असा होता की इंग्रज राज्य संपलेले होते. भारत स्वतंत्र होता. त्यात हैदराबाद नव्हते, म्हणजे हैदराबाद स्वतंत्र राष्ट्रच झाले होते. हैदराबाद भारताशी मैत्री व शांततेने राहू इच्छिते, फक्त भारताने हैदराबादचे स्वातंत्र्य मान्य करावे ही निझामाची मागणी होती.

 निझामाने वाटाघाटी लांबवीत पुढे जैसे थे करार केला. पुन्हा वाटाघाटीचे गुऱ्हाळ सुरू झाले. निझामाला वाटाघाटी लांबतील तितक्या हव्या होत्या. हैदराबाद प्रश्न युनोकडे नेण्याची त्याची तयारी होती. हा घोळ जर असाच काही वर्षे लांबत राहिला असता तर वहिवाटीनेच हैदराबादचे स्वातंत्र्य सिद्ध झाले असते. ह्याचा आरंभ म्हणून युनोत हा प्रश्न नेण्यात निझामाने यशही मिळविले होते.

 हैदराबादचा प्रश्न हा भारताच्या प्रादेशिक अखंडत्वाचाच प्रश्न होता. हैदराबाद जर भारतात विलीन झाले नसते. तर एकात्म भारतही शक्य नव्हता. भाषावार प्रांतरचनाही शक्य नव्हती, भारतीय संविधानच आहे तसे दिसले नसते. हैदराबाद प्रश्न संपल्यावरच संविधानाची चर्चा खरोखरी सुरू झाली. तोवर आराखडाच चालू होता. निझाम हा जनतेच्या स्वातंत्र्याचाही शत्रू होता. भारतीय राष्ट्रवादाचाही शत्रू होता. हिंदू तर त्यांच्या राज्यात गुलाम होतेच, पण मुसलमानही दरिद्री व अशिक्षितच होते. लोककल्याण हा निझामाचा हेतू नव्हता. म्हणून निझाम संपला, निझामी राज्य संपले, भारताच्या नकाशावरसुद्धा हैदराबाद उरले नाही, याचे दुःख मानण्याचे कारण नाही. उलट हैदराबाद संपल्याचा आम्हाला अतोनात आनंद आहे, पण जो शत्रू संपला त्याचे सत्यरूपही आपण समजून घेतले पाहिजे. श्रीमंत पण कद्रू असे हास्यास्पद विदूषकाचे रूप नव्हे, ते पाताळयंत्री धूर्त असुराचे रूप आहे.

***

(प्रकाशन : ‘रुद्रवाणी' जानेवारी १९७७)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०२