पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विश्वास टाकणे कठीणच असे. ओळख सर्वांची. त्यांच्या कर्तृत्वाविषयी सर्वांना आदर पण त्यांना कुणी जीवलग नाही व त्यांचे कुणी जीवलग नाही असा प्रकार घडे. ज्या व्यक्तीचा व माझा साक्षात परिचय कधीच नव्हता, फक्त दुरून पाहण्यापलीकडे ज्यांची माझी ओळख नव्हती, त्यांच्या व्यक्तित्वाविषयी यापेक्षा खोलात जाऊन चर्चा करणे बरे नव्हे.

 मुनशी हे मूळचे टिळकानुयायी. मुंबईतील लोकमान्यांच्या चाहत्यांनी काँग्रेसबाहेर पडून जीनांच्या नेतृत्वाखाली होमरूल लीग स्थापन केली होती तिचे हे कार्यकर्ते, त्याही वेळी एक तरुण कायदेपंडित म्हणून त्यांचा लौकिक होताच. गांधीयुगात ते काँग्रेसमध्ये आले आणि लवकरच काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. स. का. पाटलांच्याप्रमाणे ते मुंबई काँग्रेसशी कधी एकजीव झाले नाहीत. मोरारजी देसाईंप्रमाणे गुजराथशी एकजीव झाले नाहीत. तरी १९३० सालच्या काँग्रेस मंत्रिमंडळात ते मुंबईचे गृहमंत्री होते. उत्तम प्रशासक, चाणाक्ष मुत्सद्दी आणि जातीय दंगलींना तोंड देण्यास कठोर निश्चयी अशी त्यांची ख्याती झाल्यामुळे त्यांचा सर्वत्र दबदबा होता. हे सारे यश त्यांनी एका निर्णयाने गमावले. १९४२ च्या चळवळीत त्यांनी काँग्रेसचा त्याग केला, काँग्रेस वनवासातून बाहेर पडल्यानंतर १९४५ साली मुंबईत जे मंत्रिमंडळ वनले त्यात त्यांना जागा मिळू शकली नाही. त्यांचे कायदेपांडित्य लक्षात घेऊन त्यांना घटनासमितीवर (व संसदेवर) घेण्यात आले. संविधानाच्या चर्चा करीत बसणे हे क्षेत्र मुनशींना फार अपुरे होते. ते नव्या कर्तृत्वाला कुठे संधी मिळते ह्याची वाट पाहात होते.

 हंगामी मंत्रिमंडळात आणि पुढे स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात मुनशींना जागा मिळालीच नाही. काका गाडगीळ मंत्री झाले. स. का. पाटलांचे वजन वाढले. मोरारजी गृहमंत्री झाले आणि आपण तसेच राहिलो ही खंत त्यांना थोडी नव्हती, अनेक संस्थानिकांचे ते सल्लागार असल्यामुळे गुजराथेतील एखाद्या संस्थान मंडळात त्यांना जागा मिळायला हवी होती, पण तिथे ढेवरभाईंची वर्णी लागली. ज्युनियर मंडळी सत्तेवर आली तरी मुनशी मोकळेच होते. या वाट पाहण्याला शेवटी जैसे थे करारामुळे यश आले. ह्या कारणाने त्यांचा हैदराबादशी संबंध आला. ५ जानेवारी १९४८ ला मुनशी एजंट जनरल म्हणून हैदराबादला दाखल झाले.

 हैदराबाद संस्थान ही भारत सरकारची कायमची डोकेदुखी होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी सर्व संस्थानिकांनी भारतात सामील होण्याचा शेवटचा दिवस १५

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०४