पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजूने घेतला होता.

 आधुनिक जगात खऱ्या अर्थाने एका माणसाचे राज्य नसते. त्या राज्याला मनापासून पाठिंबा देणारा एक गट हवा असतो. असा गट कायम करण्यासाठी निझामाने इत्तेहादुल मुसलमीन ह्या संघटनेची स्थापना करून घेतली. (इ.स.१९२६) निजामाला हैदराबाद संस्थानात मुस्लिम लीग नको होती. ब्रिटिश इंडिया हे वेगळे राष्ट्र, हैदराबाद हे वेगळे राष्ट्र. तेव्हा या पृथक राष्ट्राला पृथक संघटना हवी ही तर निझामाची दृष्टी होतीच, पण त्याला स्वतःला जीनाचे नेतृत्व स्वीकारणारा अनुयायी व्हायचे नव्हते. त्याला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचणारी संघटना हवी होती. सोळा लक्ष मुसलमानांना हे आपले राज्य आहे, त्याचे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रात रूपांतर करणे व हे राष्ट्र जतन करणे आपले कर्तत्व आहे असे स्वप्न निझामाने दिले व ह्या संघटनेमार्फत त्याने सुमारे दीड लक्षाची अनधिकृत फौजही रझाकार या नावाने तयार केली.

 वर जागोजागी इसवी सन दिलेले आहेत. त्यांचा काळजीपूर्वक विचार केला तर हे दिसून येईल की निजामाने स्वतंत्र होण्याची तयारी इ.स. १९४७ च्या आगेमागे केलेली नाही. तो सतत तीस वर्षे स्वातंत्र्याची टप्प्याटप्प्याने तयारी करीत होता. आणि ह्या तयारीसाठी त्याने अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा खर्च केलेला होता. केवळ कद्रू व कंजूष म्हणून मीर उस्मान अलीखाँचा विचार करणे बरोबर नाही. निजामाच्या डोक्यात मध्ययुगीन स्वप्ने होती. इराणची राजकुमारी दुर्रेशहरवर त्याने आपल्या मुलाला सून म्हणून आणली होती. तुर्कस्तान आणि सौदी अरेबियाच्या राजकुमारिका आपल्या स्नुषा होतील का ह्याचाही प्रयत्न तो करीत होता.

 आपण विस्तवाशी खेळत आहो याची त्याला जाणीव होती. त्या दृष्टीने गरजच पडली व परांगदा व्हावे लागले तर उपयोगी पडावे म्हणून जगभर त्याने पैसा पेरलेला होता. इराणमधील तेलाच्या खाणी, दक्षिण अमेरिकेतील खाणी, स्वित्झर्लंड आणि बँकऑफ लंडनमध्ये ठेवी असा त्याचा भारताबाहेर सुमारे ५० कोटी रुपयांचा व्यवहार होता.

 शेवटची गोष्ट ही की निझामाला दम होता. त्याच्या पूर्वजांचाही गुण शौर्य नव्हता. चिवटपणे टिकून राहणे व प्रतिकूल परिस्थितीत तग धरणे हेच निझामाचे घराणे करीत आले. तेच निझाम करीत होता. त्याच्या धूर्तपणाला अर्थ होता. १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत निझाम भारतात सामील झालाच नाही. वाटाघाटी नंतर सुरू

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / १०१