पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निजामाचा पत्रव्यवहार झालेला आहे. (इ.स. १९२६) ह्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेमुळेच निझाम चेंबर ऑफ प्रिन्सेसचे सभासद कधी झाले नाहीत. (इ.स. १९३८).

 निजामाला ह्या गोष्टीची जाणीव होती की स्वतंत्र राष्ट्र सिद्ध करणे ही सोपी गोष्ट नसून अवघड बाब आहे. त्यासाठी नानाविध प्रकारची पूर्वतयारी करावी लागेल. निझामाने ह्या दृष्टीने नाणेव्यवस्थेपासून आरंभ केला. हैदराबाद संस्थानने स्वतःची नाणी पाडली. नोटा छापल्या. त्यांना भारतीय नाण्यांशी विनिमय दर ठरविला. स्वतःच्या बँका निर्माण केल्या. हैदराबाद बँकेचा पौंडाशी विनिमय दर ठराविक असे. बँक ऑफ लंडनमध्ये ह्या बँकेच्या व्यवहारात पत होती. एका स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे निझामाने अर्थव्यवस्था आखलेली होती. त्याने स्वतःचे विद्यापीठ निर्माण केले. (इ. स. १९१८) भारतात देशी भाषेतून मेडिकल, इंजिनियरिंग सायन्सचे उच्च शिक्षण देणारे हे एकमेव विद्यापीठ होते. हैदराबादच्या स्वतःच्या पदव्या, नोकऱ्या होत्या. भारतातील I.C.S. प्रमाणे हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस होती. छोटेसे स्वतःचे लष्कर होते. पगाराचे मानही बरे होते. संस्थानची स्वतःची स्वतंत्र रेल्वे, पोस्ट व तारयंत्रणा होती आणि स्वतंत्र विमान व्यवस्थेचा विचार चालू होता.

 स्वतंत्र राष्ट्र होण्यासाठी निझामाने अजून तीन प्रकारची तयारी केली होती. एकतर त्याने औद्योगिक विकासाच्या दृष्टीने कारखानदारीला आरंभ केला. अनेक धरणे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात निजामसागर धरण हे मोठे धरण होते. साखर कारखाने काढण्याचा उपक्रम केला. कापड गिरण्या काढल्या. कोळशाच्या खाणी सिद्ध केल्या. इतरही औद्योगीकरणाचा अव्याहत प्रयत्न चालू होता. स्वतंत्र राष्ट्राला औद्योगिक समृद्धी आवश्यक आहे ह्याची उस्मान अलीना जाणीव होती. त्यांनी सीनियर केंब्रिज माध्यमाची एक शाळा चालवून केंब्रिज इंग्रजी बोलणाऱ्या मुत्सद्दयांची एक पिढी जन्माला घातली. जागतिक व्यासपीठावर मुत्सद्देगिरी कौशल्याने पार पाडू शकणाऱ्या ह्या पिढीतूनच नबाब अलीयावर जंग यांचा उदय झाला. ह्यासह जगभर सहानुभूती असणारे वर्तुळ निर्माण केले. हैदराबाद एक स्वतंत्र राष्ट्र व्हावे या कल्पनेला अरब राष्ट्र, इराण व पाकिस्तानमध्ये पाठिंबा असला तर नवल नाही, पण इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल येथेही निजामाला फार मोठा पाठिंबा होता. हैदराबाद संस्थानात लहानमोठ्या हिंदू वतनदार जागीरदारांचा असा एक मोठा वर्ग तर निझामाच्या पाठीशी होताच, पण दलित समाजही त्याने आपल्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१००