पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व सावध तोच प्रकार ह्या सातव्या वारसाचा आहे. मुळात निझाम हे मोगल सम्राटांच्या वतीने दक्षिणेचे सुभेदार, पण मोगल साम्राज्याच्या ऱ्हासाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. मराठ्यांच्या सामर्थ्यासमोर टिकाव लागेना म्हणून इंग्रजांशी सख्य जोडून हे राज्य त्यांनी टिकविले, उस्मान अली ह्याच मार्गाने जात होते. भारत स्वतंत्र होत आहे ह्या प्रसंगी केन्द्रसत्तेत जे शैथिल्य व विस्कळीतपणा येईल त्याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा स्वतंत्र राज्य (राष्ट्र) निर्माण करावे हा उस्मान अलीचा प्रयत्न होता. हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्रात रूपांतर ही उस्मान अलीची प्रबळ व चिवट महत्त्वाकांक्षा होती.

 इ. स. १९११ मध्ये उस्मान अली गादीवर आले. (जन्म १८८५ इ. स.) त्यावेळी अजून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्रही नव्हता. पण उस्मान अलीच्या डोक्यात मात्र हैदराबादच्या स्वातंत्र्याचा प्रश्न घोळत होता. गादीवर येऊन आपले आसन स्थिर झाले आहे ह्याची खात्री पटताच निझामाने स्वातंत्र्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. हे त्याचे प्रयत्न तीन भिन्न दिशांनी सुरू झाले. ह्या दिशांचा विचार आपण करू लागलो म्हणजे निजाम हे किती दूरचा विचार करीत होते यावर प्रकाश पडतो. शंभर वर्षांपूर्वी वऱ्हाड इंग्रजांना कर्जफेडीसाठी दिलेला होता. वऱ्हाडवर ताबा इंग्रजांचा असला तरी तत्त्वतः तो निझामचा भाग आहे, हे इंग्रजांनी मान्य केलेले होते. निझामाचे म्हणणे असे की कर्ज परत घ्यावे व वऱ्हाड परत करावा. एका बाजूने हा प्रदेश वाढविण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजूने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने करार करणारे आहोत हे दाखविण्याचाही प्रयत्न होता. निजामाने पद्धतशीरपणे प्रयत्न करून आपल्याला हैदराबाद संस्थानात घालण्यात यावे अशी मागणी करणारा व त्यासाठी चळवळ करणारा एक प्रभावी हिंदू नेत्याचा गट वऱ्हाडात अस्तित्वात आणला होता. ह्या धर्मपिसाट जातीय राजेशाही पंखाखाली आम्हाला जाऊ द्या. अशी मागणी करणारा, हिंदूंचा गट अस्तित्वात आणणारा निजाम चतुर व दूरदृष्टीचा नाही असे कोण म्हणेल?

 निजामाचा दुसरा दावा असा की, निजाम आणि इंग्रज यांच्यात जे करारमदार झाले ते सर्व दोन सार्वभौम शक्तींतील करार आहेत. निझामाचे इंग्रजांशी नाते बरोबरीच्या मित्राचे असायला हवे म्हणून त्याला हिज मॅजेस्टी ही उपाधी वापरता आली पाहिजे व अंतर्गत कारभारात पूर्णपणे स्वातंत्र्य असले पाहिजे त्या दृष्टीने व्हाइसरॉयशी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९९