पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८६

त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग स्पंजासारखा पोकळ व चिवट होतो. व असल्या जमिनीवर पाणी पडले म्हणजे ते तिजमध्ये मुरते; शिवाय, ज्या जमिनीवर झाडे असतात तीवर त्या झाडांच्या पानांचे आच्छादन असल्यामुळे सूर्याचे किरणांचा आंत फारसा रिघाव होत नाहीं; व त्यामुळे जमिनीचा ओलावा बाष्पीभवनाच्या योगाने इतका नाहीसा होत नाही. जर उघड्या जमिनीवर कांहीं काळामध्ये १००भाग पाणी बाष्पीभवन होऊन जाते असे धरले, तर ज्या जमिनीवर मोठाली झाडे आहेत, अशा जमिनीपासून ३८ भाग पाणी बाप्पीभवन होईल; व ज्या जमिनीवर लहान झाडांचे गर्द आच्छादन आहे, तिच्यामधून फक्त १५भाग होईल. ह्यावरून, झाडे जमिनीमध्ये ओलावा राखण्यास किती कारणीभूत होतात, हे उघड आहे.

 ह्याचप्रमाणे, झाडांचे बुडखे पाण्याचा प्रवाह खाली वाहून जातो त्यास अटकाव करितात, त्यामुळे डोंगरामध्ये पाणी मुरण्यास त्यास सवड सांपडते. दुसरें, पाऊस पडावयास लागला म्हणजे प्रथमतः झाडावर पडून मग पानांवरून खाली पडून टिबकतो. त्या योगाने तो जमिनीमध्ये पुष्कळ मुरतो. कारण, उतरणीवरून पाणी वाहून खाली येऊ लागले असता त्यास मुरण्यास जितकी सवड सांपडते, त्यापेक्षा ते पाणी जमिनीवर लंब रेषेने पडले असता जास्त मुरले पाहिजे. डोंगरावर झाडे लाविलीं म्हणजे पडलेले पाणी त्यामध्ये अशा रीतीने सांठून राहते, व जमिनीच्या पोटामध्ये खडकाचे थर असतात, त्यांच्या फटींमधून पाणी झिरपून जाऊन जवळ अगर दूर बाहेर पडते.