पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८५

कित्येक जातीच्या झाडांच्या मुळ्या आपल्या भक्ष्यशोधनार्थ जमिनीमध्ये नीट खोल गेलेल्या असतात. ह्या मुळ्यांस मोठमोठ्या फांद्या फुटत नाहींत. अशा मुळीस सोटमुळी म्हणतात. बाभूळ हे वरील प्रकारचे सोटमुळीचे झाड आहे; म्हणजे ह्याची मुळी जमिनीमध्ये नीट खोल जाते, व तिला मोठाले फांटे फुटत नाहींत. ह्याच कारणामुळे बाभळीची झाडे काळ्या जमिनीमध्ये चांगलीं पोसतात. काळ्या जमिनीमध्ये माती पोकळ असून पुष्कळ खोलपर्यंत असते, व अशा जमिनीमध्ये बहुतकरून पाणीही पुष्कळ खोल गेलेले असते. म्हणून बाभळीची झाडे अशा जमिनीमध्ये लाविली असतां त्याची मुळे ओलावा शोषून घेण्याकरितां जमिनीमध्ये खोल जातात. व म्हणून बाभळीच्या सारखीं सोटमुळीची झाडे डोंगरावर असली म्हणजे तो डोंगर सच्छिद्र होतो. तसेच, दुसऱ्या प्रकारची कांहीं झाडे असतात, त्यांच्या मुळ्या जमिनींत विशेष खोल जात नाहींत; परंतु त्यांस असंख्य फांटे फुटून जाळ्याप्रमाणे सर्व जमिनीमध्ये पसरलेल्या असतात. वड, पिंपळ वगैरे झाडे अशा प्रकारची होत. अशा प्रकारची झाडे डोंगरावर असली, तर डोंगर पोकळ होतो. डोंगरावर झाडे असल्यापासून पृष्ठभागावरील मातीही वाढत जाते. पाऊस, वारा ह्यांच्या व्यापाराने खडकाचे पृष्ठभागाचे कण मोकळे होऊन त्यांची माती बनत असते. व ही माती झाडांच्या मुळ्या, मुळे व बुडखे यांचेमुळे वाहून न जाता तेथेच राहते. असा क्रम नेहमी चाललेला असतो. ह्याशिवाय, ह्या मातीवर प्रतिवर्षी झाडांची पाने पडून ती कुजून त्यांचाही थर झालेला असतो,