पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८२

हे मोठमोठे वाहाणारे झरेच होत. नद्यांस जे पाणी असते ते झऱ्यांंपासून प्राप्त होत नाही असे सकृद्दर्शनी वाटते; परंतु नदीचा उगम हा एक झराच असतो; व तीस जे ओढे, नाले येऊन मिळतात त्यांसही पाणी झऱ्यांंपासूनच मिळते. म्हणजे नद्याचेही एकंदर पाणी प्रत्यक्ष अगर परंपरेने झऱ्यांंपासूनच प्राप्त झालेले असते.

 आतां, झरे कसे होतात ते पाहूं. झरे सुटण्यास पाण्याचा सांठा उंच जागेवर पाहिजे. एकाद्या उंच भांड्यांत पाणी भरून ठेविलें, व त्यास मध्यभागी फार बारीक बारीक छिद्रे पाडिली, तर त्यांमधून पाणी पाझरूं लागेल. हा एक प्रकारचा झराच म्हणावयाचा. एक प्रकारचा म्हणण्याचे कारण इतकेच की, भांड्यांतून जे पाणी झिरपते त्यास झरा ही संज्ञा नाहीं. जमिनींतून जे पाणी पाझरते त्यासच झरे म्हणतात. तथापि, ही दोन्ही पाझरणीं एकसारखीच होत. दोहींसही पाण्याचा सांठा उंच जागेवर असून मध्यंतरी छिद्रे पाहिजेत. उंच जागेतील पाण्याचा सांठा छिद्रांच्या खाली आल्यावर पाणी छिद्रांतून पाझरणार नाहीं हे उघड आहे. म्हणून जमिनींतून पाझर फुटण्यास जवळ अगर दूर कोठेतरी त्या जमिनीपेक्षा उंच जमीन असून तिजमध्ये पाणी साठलेले असले पाहिजे. जमिनीच्या पोटामध्ये खडकांचे थर आहेत, त्यांच्या फटींतून उंच जागेतील पाणी वाहात येते; व त्यास बाहेर पडण्यास जेथे छिद्र सांपडते, तेथून ते बाहेर पडते. अशा रीतीने बाहेर पडलेल्या पाण्यास झरा म्हणतात.